मुंबई

विदेशी शक्तींच्या मदतीने अराजक पसरवण्याचे आंतरराष्ट्रीय षडयंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची इंडि आघाडीवर घणाघाती टीका

मुंबई : विदेशी शक्तींच्या मदतीने काँग्रेस व इंडि आघाडीला भारतात अराजकता पसरवायची असून हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काँग्रेस व इंडि आघाडीच्या नेत्यांचा सर्वोच्च न्यायालयावर काढलेला मोर्चा हा भारताच्या इतिहासातील काळा दिवस होता, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सोमवारचा दिवस हा देशाच्या इतिहासतला काळा दिवस होता. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणे, आंदोलन करणे हे यापूर्वी इतिहासात कधीही घडले नाही. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि इंडि आघाडीचे लोक याचिका दाखल करण्याच्या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयावर चाल करुन गेले, या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ही घटना म्हणजे भारताच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेवर हल्ला आणि सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा अपमान आहे, याबद्दल विरोधकांनी भारताच्या १४० कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे, असे ते म्हणाले. आंदोलनाला शिवतांडवची उपमा देऊन राहुल गांधी यांनी महादेवाचाही अपमान केला. त्यांचे आंदोलन शिवतांडव नसून सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचा थयथयाट होता, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. शंकराने तिसरा डोळा उघडला तर इंडि आघाडी नष्ट होईल, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, संविधान हातात घेऊन संविधान कसे नष्ट होईल, लोकशाहीचा गळा कसा घोटला जाईल, हे मागील काही दिवसांमध्ये इंडि आघाडीने आंदोलनातून दाखवून दिले. पंतप्रधानांच्या निवासस्थानसमोर आंदोलन असो किंवा सध्या दिल्लीत दररोज सुरु असलेली राजकीय आंदोलने ही देशासाठी धोकादायक आहेत. अनेक विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायेत. चीन बलवान झाला तसा भारताला बलवान होऊ देणार नाही, असे काहीजण म्हणाले होते. हा आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

देशामध्ये अराजकता पसरवण्याचे कृत्य विरोधी पक्ष नेते आणि इंडि आघाडीचे लोक करत आहेत, हे दुर्देवी, दुर्भाग्यपूर्ण आणि देशाला घातक आहेत. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंकेत जनक्षोभ उसळला, अशी उदाहरणे ते देतात यातून त्यांना काय सांगायचे आहे, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. विरोधकांना आता निवडणुकांमधून जिंकता येणार नाही, याची खात्री झालीय. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर त्यांचा तीनवेळा पराभव झालाय. पराभवाची हॅट्ट्रीक झालीय, त्यामुळे सत्ता काबीज करता येत नाही तर देशात अशांतता किंवा अराजकता कशी पसरेल, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम विरोधक करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या शौर्यावर शंका उपस्थित करणे हा देशद्रोहच आहे. यापूर्वी पत्रकारांना गोदी मिडिया, दिल्लीच्या पोलीसांना गुंड म्हणणे, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांनी आरोप केले होते, असे ते म्हणाले. विरोधक ईव्हीएम मशीनवर संशय घेतात, निवडणूक आयोगावर हल्ला करतात मात्र पुरावे देत नाही. याच निवडणूक आयोगाच्या कार्यकाळामध्ये तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू अशी काही राज्य जिंकले, तिथं त्यांनी मत चोरी केली का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. विरोधकांनी सरन्यायाधीशांसंदर्भात गंभीर ट्विट केलं होते. सरन्यायाधीशांना राजीनामा देण्याबाबत इशारा देण्याची मजल विरोधकांची गेली आहे. ही घातक प्रवृत्ती देशात बळावत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चिंता व्यक्त केली. महायुती सरकारमध्ये संवाद आहे, विसंवाद नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकार म्हणून एकत्रित निर्णय घेत असतो. एकमेकांवर विश्वास आहे, असे ते म्हणाले.

भारत तोडोची भाषा करणाऱ्यांसाठी बाळासाहेबांचे वारस पाठिंबा देतात

उमर खालिद आणि शर्जील इमाम याने भारत तोडोची भाषा केली होती. त्या गँगला सोडा म्हणून शिवाजी पार्कात उबाठा गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली. ज्यांनी भारत तोडोची भाषा केली त्यांना सोडण्यासाठी देशप्रेमी म्हणवणारे, बाळासाहेबांचे वारस मुंबईत आंदोलन करतात. दिल्लीप्रमाणे गल्लीत काहीजण आंदोलन करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

भारताची प्रगती विरोधकांच्या डोळ्यांत खुपतेय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची झालेली प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतेय. जगभरात युद्धजन्य परिस्थिती असताना पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारताला राजकीय आणि आर्थिक स्थैर्य मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३६ देशांनी सर्वोच्च पुरस्काराने गौरवले. देशाबद्दल प्रेम असते तर विरोधकांना आनंद झाला असता पण विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. अब्राहम लिंकन म्हणाले होते, सत्ता काबीज करा नाहीतर देश नष्ट करा या मानसिकतेतून इंडि आघाडी दररोज आंदोलन करतेय. राहुल गांधी भारताची बदनामी करतात त्याची पाकिस्तानात हेडलाईन होते ही कोणती देशभक्ती आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. आणीबाणीसारखी परिस्थिती असती तर विरोधक सुप्रीम कोर्टापर्यंत गेले असते का, जंतर मंतरवर आंदोलन केले असते का, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केला. आणीबाणीत लाखो लोक तुरुगांत होते, माध्यमांवर बंदी होती, आता तशी परिस्थिती नाही, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ज्या संस्था निर्माण केल्या त्यांच्याबाबत गोबेल्स नितीप्रमाणे खोटं बोलून अविश्वास निर्माण करायच्या, असे ते म्हणाले.

Related Articles

Back to top button