Mumbai Protest: ‘तुषार गांधींना सोडेपर्यंत जाणार नाही’; आदित्य ठाकरे-संजय राऊतांचा पोलीस ठाण्यात ठिय्या…

प्रशांत गोडसे
मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत सुरू झालेल्या आंदोलनाला शनिवारी वेगळे वळण मिळाले. ऑगस्ट क्रांती मैदानावर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याचवेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब डी. एन. नगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.
‘तुषार गांधी यांची सुटका होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून बाहेर जाणार नाही,’ अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, पोलीस ठाण्याबाहेरही शिवसैनिकांची गर्दी जमू लागली आहे.
ऑगस्ट क्रांती मैदानावर घोषणाबाजी; आंदोलकांची धरपकड
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी होती.
मात्र, आंदोलनादरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याला विरोध करत आंदोलकांनी पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अभिनेता इम्रान खान यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ऑगस्ट क्रांती मैदान परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले, तर काही आंदोलकांना ग्रँट रोड परिसरातूनही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
तुषार गांधींच्या सुटकेसाठी ठाकरे-राऊत मैदानात
तुषार गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच त्यांच्या सुटकेची मागणी जोर धरू लागली. आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांनी डी. एन. नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तुषार गांधी यांना सोडण्याची मागणी करत समर्थकांनीही पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिला आहे.
‘तुषार गांधी यांची सुटका होईपर्यंत आम्ही बाहेर जाणार नाही,’ अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. शिवसैनिकांची गर्दी जमू लागली आहे.
आंदोलनाचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनात पोलिसांची कारवाई, तुषार गांधी यांना ताब्यात घेण्याची घटना आणि त्यांच्या सुटकेसाठी नेत्यांनी घेतलेली भूमिका यामुळे प्रकरण तापले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या
राजीनाम्याच्या मागणीने पेटलेले आंदोलन, धरपकडीने वाढलेला तणाव आणि तुषार गांधींच्या सुटकेसाठी ठाकरे-राऊतांचा पोलीस ठाण्यात ठिय्या! आता हा संघर्ष कोणते वळण घेणार आणि पोलिसांच्या कारवाईवरून राजकीय वातावरण किती तापणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



