खारमधील कपड्यांच्या दुकानात चोरी; नाशिकमधून तिघांना अटक

३ लाख ९० हजारांचे २४० कपडे हस्तगत; दोन गुन्ह्यांची उकल
मुंबई : कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात येऊन कपडे चोरी करणाऱ्या तिघांना खार पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी शर्ट, पॅन्ट, स्वेटर, जिन्स आणि ट्रॅक पॅन्ट असे एकूण २४० कपडे हस्तगत केले असून, त्यांची किंमत तीन लाख ९० हजार रुपये आहे. खार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
११ सप्टेंबर २०२६ रोजी खार पश्चिम येथील शुभ्रा अपार्टमेंटमधील दुकान क्रमांक २ मध्ये हा चोरीचा प्रकार घडला होता. फिर्यादी राजेश नरसी पटेल यांच्या दुकानात आरोपी कपडे खरेदी करण्याच्या बहाण्याने आले होते. यावेळी त्यांनी दुकानातील कपडे चोरी केले. चोरी करताना कोणताही पुरावा मागे न सोडल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते.
खार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. आरोपी नाशिकमधील कुरेशी नगर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ७ ऑक्टोबर २०२६ रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या मदतीने तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचे सर्व २४० कपडे हस्तगत करण्यात आले. त्यामुळे खार पोलीस ठाण्यातील गुन्हे क्रमांक १६२९/२०२६ आणि १७३५/२०२६ या दोन्ही गुन्ह्यांतील चोरीची मालमत्ता शंभर टक्के हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान आरोपींचा वडाळा तसेच आर. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अशाच प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांशीही संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. मोहितकुमार गर्ग आणि खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष काटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शैलेश चौधरी आणि त्यांच्या पथकाने केली.



