मुंबई

Political News: सुप्रीम कोर्ट मोर्चावरून शिंदे आक्रमक; विरोधकांना दिला इशारा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून न्यायव्यवस्थेवर दबाव आणणे हा घटनात्मक संस्थांचा अपमान आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडी आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. संविधान हातात घेऊन संविधानिक संस्थांवरच दबाव आणता; हा प्रकार देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न असून तो खपवून घेतला जाणार नाही, अशा परखड शब्दात एकनाथ शिंदे यांनी खडसावले. ते मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयासारख्या देशाच्या सर्वोच्च घटनात्मक संस्थेवर दबाव आणण्यासाठी मोर्चा काढण्याचा प्रकार गंभीर आहे. संविधानाने सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग यांसारख्या संस्थांना स्वतंत्र स्थान दिले आहे. त्यामुळे या संस्थांवर दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न म्हणजे घटनात्मक व्यवस्थेचाच अवमान असल्याचे शिंदे म्हणाले.

या आंदोलनामागे परकीय शक्तींचा कट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा गंभीर आरोप करत शिंदे यांनी देशात अस्थिरता आणि अराजकता निर्माण करणाऱ्या प्रयत्नांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. देशाच्या घटनात्मक संस्थांवर अविश्वास निर्माण करून चुकीचे नॅरेटिव्ह उभे करण्याचे राजकारण देशहिताचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सार्वजनिक जीवनात २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र मंत्रिमंडळाने त्यांच्या नेतृत्वाचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर केला असून तो पंतप्रधानांकडे पाठविण्यात येणार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची जगभरात नवी ओळख निर्माण झाली असून ३६ देशांनी त्यांना सर्वोच्च सन्मान दिल्याचा उल्लेख शिंदे यांनी केला.

२०१४ पूर्वी भारताची गणना ‘फ्रॅजाइल फायव्ह’मध्ये होत होती; आज भारत जगातील आघाडीच्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये असून चौथ्या क्रमांकाकडे वाटचाल करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य असून, मोदींच्या नेतृत्वाखाली ३२ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले, तर सुमारे ८० कोटी नागरिकांना अन्नधान्याचा आधार मिळत असल्याचे शिंदे म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांची कलम ३७० हटविण्याची आणि अयोध्येत राम मंदिर उभारण्याची स्वप्ने काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रलंबित राहिली; मोदींच्या नेतृत्वाखाली ती पूर्ण झाली, असा घणाघात शिंदे यांनी केला. काँग्रेसच्या काळात दहशतवादी हल्ल्यांनंतर केवळ पत्रव्यवहार होत होता; मात्र पाहलगामनंतर मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून ‘पत्र लिहिणारा नव्हे, थेट प्रत्युत्तर देणारा भारत’ जगाला दाखवून दिला, असा टोला त्यांनी लगावला.

२०१४ नंतर मोदींच्या नेतृत्वावर भ्रष्टाचाराचा डाग लावण्यात विरोधक अपयशी ठरले, असे सांगत त्यांनी २-जी, कोळसा आणि बोफोर्ससारख्या प्रकरणांचा उल्लेख केला. १४० कोटी जनता मोदींच्या पाठीशी असून विरोधकांना जनतेने तीन वेळा नाकारले आहे, असेही शिंदे म्हणाले.

राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून २६५ वरून ३०५ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. कर्जवसुली स्थगिती, कर्ज पुनर्गठन, विद्यार्थ्यांना शुल्कमाफी, चारा-पाणी अशा १२ सवलती देण्यात येत आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ५ हजारांची मदत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचा असून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

केंद्राचे पथक पाहणी करून गेले असून, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिंदे यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा करून पूर्ण मदतीचे आश्वासन दिले. अमित शाह यांनीही मदतीची ग्वाही दिली.

दुष्काळात शेतकरी महत्त्वाचा की सुप्रीम कोर्टावरील आंदोलन? असा सवाल करत शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. ‘मोदी जलनेवालों की परवाह नहीं करते; काम करत राहतील. शेर गीदड़ों के शोर से नहीं डरता,’ असा घणाघात करत त्यांनी देशाचा मार्ग विकास, सुरक्षा आणि शेतकरी कल्याणाचा असल्याचे स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button