ST Bus Fare Hike: दिवाळीत एसटीची भाडेवाढ नाही! प्रताप सरनाईक

मुंबई : दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटीच्या तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागणार नाहीत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला. त्यामुळे प्रस्तावित हंगामी भाडेवाढीला तूर्तास ब्रेक लागला आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा वेळी प्रवासाचा खर्च वाढवणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका सरनाईक यांनी घेतली. एसटी प्रशासनाने दिवाळीतील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र, जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, यासाठी त्यांनी तो फेटाळला आहे.
ग्रामीण प्रवाशांना दिलासा
ग्रामीण महाराष्ट्रात एसटी ही प्रवासाचे प्रमुख साधन आहे. विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणावर एसटीवर अवलंबून असतात. दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढते. अशा परिस्थितीत तिकिटांच्या दरात वाढ झाली असती, तर प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त कात्री लागली असती.
दुष्काळामुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना हा खर्च परवडणारा नसल्याचे सांगत सरनाईक यांनी भाडेवाढीला नकार दिला असल्याचे सांगितले जातं आहे.
एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार
एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत असले, तरी त्याचा भार थेट प्रवाशांवर टाकणे योग्य नसल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. महामंडळाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी पर्यायी उपाय शोधण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास उपलब्ध करून देणे हे एसटीचे महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी सोडवताना प्रवाशांच्या हितालाही प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका परिवहन मंत्र्यांनी मांडली.
दुष्काळ आणि महागाईच्या काळात दिवाळीपूर्वी भाडेवाढ टाळून सरकारने प्रवाशांना दिलासा दिला आहे. मात्र, एसटीचा आर्थिक तोटा भरून काढताना प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा ठेवण्याचे आव्हान महामंडळासमोर कायम आहे.



