मुंबई

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनसे नेत्यांची बैठक

आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यावरील गुन्हे आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाच्या दिशेवर चर्चा होणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, संदीप देशपांडे, अमित ठाकरे, यशवंत किल्लेदार यांच्यासह काही विभाग अध्यक्ष शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुरू असलेले आंदोलन, सीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला मिळालेला पाठिंबा आणि पुढील आंदोलनाची दिशा याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, रविवारी दादर येथील शिवाजी पार्क परिसरात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या वेळी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी आंदोलकांना पाठिंबा दिला होता. अमित ठाकरे यांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आंदोलकांना सोडण्याची मागणी केली होती. तर आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांना पोलीस ठाण्यात घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला अडवून त्यावर चढत निषेध नोंदवला होता.

यानंतर आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, आमदार अनिल परब, आमदार भास्कर जाधव, संदीप देशपांडे, नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गेले होते. आंदोलकांची सुटका करण्याची मागणी या वेळी करण्यात आली होती.

या घडामोडींनंतर पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित नेत्यांविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे आणि परवानगीशिवाय आंदोलन करणे, अशा आरोपांखाली भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणावरून मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मनसेने आज शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील सह्यांची मोहीम, आजच्या आंदोलनाचे नियोजन आणि नेत्यांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत पुढील भूमिका यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर मनसेकडून आंदोलनाबाबत पुढील दिशा स्पष्ट केली जाण्याची अपेक्षा आहे.

Related Articles

Back to top button