Rahul Gandhi Detention: मुंबईत युवक काँग्रेसचा मध्यरात्री रास्ता रोको.

मुंबई : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने बुधवारी रात्री वांद्रे रिक्लेमेशन येथे रास्ता रोको आंदोलन केले. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
दिल्लीमध्ये निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी निघाले असताना त्यांना पोलिसांनी अडवून ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रात्री सुमारे ११ वाजता वांद्रे रिक्लेमेशन येथे रस्त्यावर उतरून वाहतूक रोखली.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी केली. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे काही काळ या परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण करून केसाला धरून ओढत ताब्यात घेतल्याचा आरोप मुंबई युवक काँग्रेसने केला आहे. अनेक कार्यकर्त्यांना पोलीस वाहनातून नेण्यात आल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले.
राहुल गांधी यांच्या ताब्यात घेण्याच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे युवक काँग्रेसने स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मतदार याद्यांबाबत काँग्रेसकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील या आंदोलनाकडे पाहिले जात आहे.



