घुसखोरांची नावे मतदार यादीत घुसवण्यासाठीच एसआयआरला विरोध; नवनाथ बन यांचा आरोप

तीन कोटी पात्र मतदारांना फॉर्म सहाद्वारे पुन्हा नोंदणीची संधी असल्याचा दावा
मुंबई : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला (एसआयआर) विरोध करण्यामागे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याचा हेतू असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. एसआयआर प्रक्रियेत १३ कोटी मतदारांना वगळण्यात आल्याचा दावा करून विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बन म्हणाले की, संबंधित आकडेवारीनुसार, १३ कोटी मतदारांपैकी ६.३० कोटी मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाले आहेत, २.८ कोटी मतदारांचा मृत्यू झाला आहे, तर १.२ कोटी मतदारांची दुबार नोंदणी आढळली आहे. उर्वरित ३.१ कोटी मतदार अद्याप सापडलेले नसल्याचा दावा त्यांनी केला. या गटातील पात्र मतदारांना फॉर्म सहाद्वारे पुन्हा नोंदणी करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
२००२ च्या मतदार यादीत नाव नसलेल्या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना पुन्हा नोंदणी करता येणार नाही, असा दावाही बन यांनी केला. घुसखोरांची नावे मतदार यादीत पुन्हा समाविष्ट व्हावीत, यासाठीच निवडणूक आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवर आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले. हे सर्व दावे भाजपची भूमिका म्हणून त्यांनी मांडले.
विरोधकांच्या आंदोलनावर टीका
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांची पोलखोल केल्याचा दावा करत बन यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. दिल्लीत आंदोलनासाठी आठ ते साडेआठ हजारांपेक्षा अधिक लोक जमू शकले नाहीत, असा दावा त्यांनी केला. दादर येथील शिवाजी पार्कवरील आंदोलनातही २०० ते २५० लोकांपेक्षा अधिक उपस्थिती नव्हती, असे ते म्हणाले.
भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) ३०० पेक्षा अधिक खासदार असल्याचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सत्तेतून हटवण्याचे विरोधकांचे स्वप्न पूर्ण होणार नसल्याचे बन यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जनतेने विरोधकांना यापूर्वीच नाकारल्याचा दावाही त्यांनी केला.
रामलीला मैदानावरूनही टोला
जंतर-मंतर परिसरातील नागरिकांना आंदोलनांमुळे त्रास होत असल्याने विरोधकांना रामलीला मैदानासह अन्य मैदानांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्याचे बन यांनी सांगितले. विरोधकांनी रामलीला मैदानावर आंदोलन करावे; मात्र जनताच विरोधकांना उत्तर देईल, असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना तेजस्वी सूर्याशी करत बन यांनी संजय राऊत आणि विरोधकांवर टीका केली. निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारविरोधात आंदोलन करून विरोधक षड्यंत्र रचत असल्याचा आरोपही त्यांनी केला.



