मुंबई

मुंबईच्या पाणीसाठ्याचा महापौरांकडून आढावा

तलावांत साठा समाधानकारक; मात्र बाष्पीभवन आणि पुढील वर्षाच्या पावसाची चिंता

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याचा तसेच पिसे-पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा महापौर रितू तावडे यांनी प्रभाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करून आढावा घेतला. मुंबईला दररोज सुमारे चार हजार दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागतो. सध्या मुंबईत दुष्काळसदृश परिस्थिती नसली तरी राज्यातील पाणीटंचाईची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन करावे लागेल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

मुंबईत सध्या १० टक्के पाणीकपात सुरू आहे. ही कपात पुढे कायम ठेवायची की त्यामध्ये बदल करायचा, याबाबत प्रशासनासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे तावडे यांनी सांगितले. मुंबईकरांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी अल निनोच्या प्रभावामुळे पुढील काळात पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास मुंबईसमोर पाण्याचे आव्हान निर्माण होऊ शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे नियोजन आणि पर्यायी उपाययोजनांवर भर देण्याची गरज असल्याचे महापौरांनी सांगितले.

मुंबईतील पाणीचोरीच्या प्रकारांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. यापूर्वी मुंबई महापालिका आणि रेल्वेने राज्यातील दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठ्यासाठी मदत केली होती. भविष्यातही गरज भासल्यास अशा प्रकारे मदत करण्यास मुंबई तयार असल्याचे तावडे यांनी सांगितले.

बाष्पीभवनामुळे पाणीसाठ्यावर परिणाम

तलावांमध्ये पाणीसाठा चांगला असला तरी ऑक्टोबरमध्येच जाणवणारे प्रचंड ऊन आणि त्यातून होणारे बाष्पीभवन यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यावर परिणाम होऊ शकतो, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. बाष्पीभवनाचे प्रमाण सध्याच्या ३४ टक्क्यांवरून किती कमी करता येईल, याचाही विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विहार तलावाचे पुनरुज्जीवन करण्याची गरज असून, पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य वापरासाठी पर्यायी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देण्याबाबतही नियोजन करावे लागेल. स्विमिंग पूल तसेच मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरणाऱ्या आस्थापनांबाबत निर्बंध किंवा नियमन करण्याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

तलावांच्या पाहणीनंतर सध्याच्या परिस्थितीत फेब्रुवारीपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करता येईल, असे दिसत असले तरी उपलब्ध साठा त्यापुढे किती काळ पुरेल, हे सांगता येणार नाही. मेपर्यंत पाणी पुरवठा होण्याची शक्यता असली तरी त्यानंतरची परिस्थिती हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुंबईकरांनी पाणी नियोजनात प्रशासनापेक्षा एक पाऊल पुढे राहून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले. स्विमिंग पूल आणि मनोरंजन क्लबमध्ये होणाऱ्या पाण्याच्या वापराबाबत घेतलेल्या निर्णयांचा पुन्हा आढावा घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या बांधकामांपेक्षा नागरिकांना पाणी महत्त्वाचे

मुंबईत सध्या सुमारे २२०० इमारतींची बांधकामे सुरू असून त्यांची कामे पूर्ण होणेही आवश्यक आहे. मात्र, मुंबईकरांना पाणी कमी पडत असेल तर सर्वप्रथम नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले.

पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास पर्यायी उपाययोजनांचाही विचार केला जाणार आहे. २००९-१० मध्ये मुंबईत बोअरवेल खोदून पाण्याचा वापर करण्यात आला होता. त्याच धर्तीवर आवश्यकतेनुसार अशा काही पर्यायी उपाययोजना करण्याबाबतही विचार केला जात असल्याचे महापौरांनी सांगितले.

Related Articles

Back to top button