मुंबई

MPSC विद्यार्थ्यांसाठी लवकरच ‘Good News’; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील प्रश्न आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली असून, लवकरच विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळेल, असे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या अपेक्षांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार आज फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती ठाकरे यांनी दिली.

‘तरुणांची परिस्थिती पाहून जिवाची कालवाकालव होते’

नोकरी मिळवण्यासाठी तरुण-तरुणींना स्वतःचा जिल्हा, तालुका, घर आणि कुटुंब सोडून दूर राहावे लागते. त्यांना करावी लागणारी धावपळ आणि कष्ट पाहून जिवाची कालवाकालव होते, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नोकरीसंदर्भातील प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पोस्ट

सस्नेह जय महाराष्ट्र,
५ ऑक्टोबर २०२६ ला मी जेंव्हा पुण्यात एमपीएससी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली तेंव्हा मी तुमचं म्हणणं, तुमच्या रास्त अपेक्षा याबद्दल मुख्यमंत्र्यांशी बोलेन असं आश्वस्त केलं होतं.

स्वतःचा राहता जिल्हा, तालुका, आपलं घर तसेच आपल्या कुटुंबाला सोडून नोकरीसाठी राब राब राबणाऱ्या तरुणांना आणि तरुणींना पाहिलं की जिवाची कालवाकालव होते.

म्हणून आज या विषयावर माझी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली. ते देखील पूर्णपणे सकारात्मक आहेत हे जाणवलं. आणि येत्या काही दिवसांत MPSC च्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यां संदर्भात एक चांगली बातमी येईल अशी अपेक्षा आहे . तेंव्हा विद्यार्थ्यांनी देखील संयम ठेवावा.

राज ठाकरे ।

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमधील चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आता काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आश्वासनानंतर आता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निर्णयाची प्रतीक्षा आहे.

Related Articles

Back to top button