मुंबई

Water Crisis: महाराष्ट्रातील ६३५ गावांना पाणीटंचाईची झळ; ७६८ टँकर सुरू – गुलाबराव पाटील

प्रशांत गोडसे

मुंबई : राज्यात पावसाअभावी अनेक भागांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या राज्यातील ६३५ गावे आणि २,४९७ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ७६८ टँकर सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांत पाणीटंचाई अधिक गंभीर आहे. या भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासोबतच उपलब्ध विहिरी आणि अन्य जलस्रोतांचा वापर वाढवण्याचे नियोजन सुरू आहे. पाण्याची टंचाई वाढल्यास तातडीने उपाययोजना करता याव्यात, यासाठी प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक २७८ टँकर सुरू आहेत. त्याद्वारे २५४ गावे आणि १,२९९ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जळगाव जिल्ह्यात १६९ टँकरच्या माध्यमातून १६० गावे आणि ९३० वाड्यांना पाणी दिले जात आहे. अहिल्यानगरमध्ये १४६ टँकर सुरू असून, १४८ गावे आणि ९६७ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. धाराशिव जिल्ह्यातही १६६ टँकर सुरू आहेत. सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांतही टँकरने पाणी दिले जात आहे.

नवीन टँकर सुरू करण्याऐवजी पर्यायी उपाय

पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. वैजापूर आणि नेवासा यांसह विविध भागांतील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून पाण्याची उपलब्धता तपासली जात आहे.

टंचाईग्रस्त भागांत विहिरींचा वापर, नवीन विहिरी आणि बोअरवेल यांसारख्या पर्यायांचा विचार केला जात आहे. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून नवीन टँकर सुरू करण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

लातूरमध्ये सध्या टँकरची गरज नाही

काही वर्षांपूर्वी लातूर आणि विदर्भातील काही भागांत रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. मात्र, सध्या लातूरमध्ये एकही टँकर सुरू नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. भविष्यात पाणीटंचाई वाढल्यास तातडीने मदत देता यावी, यासाठी सरकारकडून नियोजन केले जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा आणि पाण्याची नासाडी टाळावी, असे आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहण्याची वेळ अनेक गावांवर आली आहे. अशा परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे ही केवळ गरज नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी बनली आहे. आज पाणी जपले, तर उद्या कोणाच्या घरातील घागर रिकामी राहणार नाही. दुष्काळाच्या या संकटात पाणी वाचवूया आणि प्रत्येकाच्या ओठांपर्यंत पाण्याचा घोट पोहोचवण्यासाठी हातभार लावूया असें आवाहन मुंबई समाचार करीत आहे.

Related Articles

Back to top button