मुंबई

जेव्हीपीडी उड्डाणपूल ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट

गर्दीच्या वेळेतील प्रवास ४५ मिनिटांवरून २० मिनिटांवर येणार; पाच प्रमुख जंक्शन टळणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जेव्हीपीडी (जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम) उड्डाणपुलाचे काम ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. या उड्डाणपुलामुळे गर्दीच्या वेळेत सध्या सुमारे ४५ मिनिटे लागणारा प्रवास २० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, परिसरातील पाच प्रमुख वाहतूक जंक्शन टाळता येणार असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या टोकापासून जुहू-वेसावे जोडरस्त्यापर्यंत हा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची पाहणी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी केली. यावेळी त्यांनी बांधकामाची सद्यस्थिती, वाहतूक व्यवस्थापन आणि कामाच्या कालमर्यादेचा आढावा घेतला. प्रकल्पाची निर्धारित मुदत ३१ मार्च २०२८ असली, तरी नागरिकांना लवकर दिलासा मिळावा यासाठी डिसेंबर २०२७ अखेरपर्यंत उड्डाणपूल सुरू करण्याच्या दृष्टीने कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

१.७५ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

या उड्डाणपुलाची एकूण लांबी १ हजार ७५० मीटर, तर रुंदी १५.१० मीटर आहे. पश्चिम उपनगरांतील रस्ते संपर्क सुधारण्याबरोबरच प्रमुख चौकांवरील वाहनांचा ताण कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. प्रस्तावित वेसावे-वांद्रे सागरी सेतू आणि मुंबई किनारा रस्ता (उत्तर) यांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे.

पायाभूत सुविधांचे स्थलांतर मोठे आव्हान

उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान जलवाहिन्या आणि मलवाहिन्यांचे स्थलांतर करणे, तसेच मेट्रो मार्गिका २ बीच्या कामाशी समन्वय साधणे ही प्रमुख आव्हाने आहेत. यामध्ये ६०० आणि ९०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिन्यांचे सुमारे ४०० मीटरपर्यंत स्थलांतर करावे लागणार आहे. तसेच, १ हजार २०० मिलीमीटर व्यासाची मलवाहिनी सूक्ष्म बोगदा तंत्रज्ञानाद्वारे स्थलांतरित करण्यात येणार असून, ३०० मिलीमीटर व्यासाची मलवाहिनीही नव्याने टाकण्यात येणार आहे.

मेट्रो स्थानकाखाली गर्डर बसविण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. याशिवाय, ९० फूट जंक्शन येथे ७२ मीटर लांबीचा कमानीच्या आकाराचा पूल उभारणे आणि जुहू सर्कल परिसरात कमी खांबांचा वापर करून मोठ्या अंतराचे स्पॅन उभारणे ही अभियांत्रिकीच्या दृष्टीने महत्त्वाची कामे आहेत.

तीन टप्प्यांत कामे पूर्ण करण्याचे निर्देश

प्रकल्पाची तीन टप्प्यांत विभागणी करून प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र चमू नियुक्त करावेत. विविध कामे समांतर पद्धतीने पूर्ण करून प्रकल्पाला गती द्यावी, असे निर्देश अभिजित बांगर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर जुहू, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा या परिसरांतील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरांतील प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

या पाहणीवेळी प्रमुख अभियंता (पूल) राजेश मुळे यांच्यासह संबंधित अभियंते, अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.

Related Articles

Back to top button