IDBI Bank : बँकांच्या भवितव्यावरून आंबेडकरांचा इशारा चर्चेत; वंचितचा केंद्र सरकारवर निशाणा.

मुंबई : बँकेत ठेवलेले पैसे ताबडतोब काढून घ्या; ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. इराण समर्थन मोर्चादरम्यान त्यांनी केलेल्या या दाव्याकडे माध्यमांनी गांभीर्याने पाहिले नव्हते. मात्र, आता आयडीबीआय बँकेच्या विक्रीच्या निर्णयामुळे बाळासाहेब आंबेडकर यांचा इशारा खरा ठरला असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.
जनतेने अजूनही सावध होण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने आयडीबीआय बँकेची विक्री करून कॅनडाच्या कंपनीकडे ६० टक्के मालकी हक्क देण्यासाठी ५३ हजार कोटी रुपयांचा सौदा केला आहे. या व्यवहाराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून, कॅनडातील फेअरफॅक्स कंपनीकडून ही खरेदी करण्यात येत आहे. सरकारने फेअरफॅक्सची खरेदीदार म्हणून निवड केली असून, प्रति शेअर ८१ रुपये या दराने हा व्यवहार प्रस्तावित असल्याचे सांगण्यात येत आहे. फेअरफॅक्स ही टोरंटो, कॅनडा येथील विमा आणि गुंतवणूक क्षेत्रातील होल्डिंग कंपनी आहे. भारतातही ही कंपनी आधीपासून सक्रिय असून, सीएसबी बँकेत तिचा सुमारे ४० टक्के हिस्सा आहे. तसेच आयआयएफएल कॅपिटल आणि पाच पैसा या कंपन्यांमध्येही तिची गुंतवणूक आहे.
फेअरफॅक्सच्या व्यवहारावर आक्षेप ―
फेअरफॅक्स आणि आयडीबीआय बँकेच्या व्यवहाराबाबत काही महत्त्वाचे आक्षेप उपस्थित केले जात आहेत. बँकेच्या विक्रीच्या प्रक्रियेदरम्यान मड्डी वॉटर्स या शॉर्ट-सेलर संस्थेच्या २०२४ मधील अहवालानंतर संबंधित समभागात सुमारे १३ टक्क्यांची घसरण झाली होती. तसेच परस्पर-मालकी आणि क्रॉस-होल्डिंग संदर्भातील नियम भंगाच्या मुद्द्यावर फेअरफॅक्सने सेबीकडे कन्सेंट सेटलमेंट मागितल्याची बाबही चर्चेत आहे. त्यामुळे या व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होत असल्याचे पातोडे यांनी म्हटले आहे.
सीएसबी बँकेच्या भवितव्याचा प्रश्न –
आता दोन बँकांच्या मालकीचा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, एकाच संस्थेला दोन स्वतंत्र बँका चालवण्यासंबंधी निर्बंध आहेत. फेअरफॅक्सकडे सीएसबी बँकेत सुमारे ४० टक्के हिस्सा असल्याने आयडीबीआय बँकेच्या व्यवहारानंतर सीएसबी बँकेचे काय होणार, हा प्रश्न निर्माण होतो. सीएसबी बँकेची विक्री करावी लागणार की तिचे विलीनीकरण होणार, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या व्यवहारामुळे एलआयसीबरोबरच सीएसबी बँकेतील भागधारक आणि कर्मचारीही बाधित होण्याची शक्यता असल्याचे पातोडे यांनी म्हटले आहे. शिवाय, बँक अधिकारी संघटनेने आयडीबीआय बँकेच्या प्रति शेअर सुमारे ८१ ते ८२ रुपये किमतीच्या मूल्यांकनाची विमा नियामक प्राधिकरणाकडून तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
बाजारभावापेक्षा कमी बोली लावल्याच्या मुद्द्यावरून आयडीबीआय बँकेच्या समभागात १०.५६ टक्क्यांची घसरण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारने याची दखल घेतली नसल्याची टीका पातोडे यांनी केली आहे.
बाळासाहेब आंबेडकरांच्या इशाऱ्याची चर्चा ―
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत यापूर्वीच गंभीर इशारा दिला होता. नागरिकांनी बँकेत ठेवलेले पैसे शक्य तितक्या लवकर काढून घ्यावेत, कारण ऑक्टोबरनंतर काही बँका अडचणीत येऊ शकतात, असे त्यांनी म्हटले होते.
या संदर्भात आंबेडकर यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ दिला होता. जागतिक संघर्ष, आर्थिक दबाव आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा त्यांनी मांडला होता.
आता आयडीबीआय बँकेच्या विक्रीच्या निर्णयामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची चर्चा सुरू झाली असून, देशातील आर्थिक परिस्थितीबाबत नागरिकांनी अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे पातोडे यांनी म्हटले आहे.
मोदी-शाह आणि भाजपवर टीका
केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना राजेंद्र पातोडे म्हणाले की, देशातील सार्वजनिक उपक्रम, बँका आणि एलआयसी यांसारख्या महत्त्वाच्या संस्थांच्या मालकीबाबत सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
दारुडा आपल्या घरातील एक-एक वस्तू विकतो, त्याप्रमाणे मोदी, शाह आणि भाजपने देशातील एक-एक सार्वजनिक उपक्रम, बँक आणि एलआयसी विकायला काढले आहेत, अशी घणाघाती टीका राजेंद्र पातोडे यांनी केली.



