Nalasopara Building Fire News : नालासोपाऱ्यात इम्पेरियल हाइट्सला भीषण आग; धुरामुळे दोन महिलांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाइट्स या उंच इमारतीला रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत धुरामुळे गुदमरून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून, सुमारे 20 ते 25 रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांना मोठी शर्थ करावी लागली.
नेमकं काय घडलं?
नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाइट्स इमारतीला रात्री अचानक आग लागली. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. सातव्या, नवव्या, बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या मजल्यांवर अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या बचावकार्यात स्थानिक नागरिकांनीही मदत केली. अतिरिक्त मदतीसाठी मीरा-भाईंदर येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या.

या दुर्घटनेत फाल्गुनी शाह (50) आणि अश्विनी पारकर (50) या दोन महिलांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, दरवाजात अडकलेल्या 14 वर्षीय मुलीला एका पोलिसाने दरवाजा तोडून स्वतःचा जीव धोक्यात घालत खांद्यावरून सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे.

अग्निशमन दलाच्या बचावकार्यात अडथळे
इमारतीच्या आजूबाजूला पुरेशी जागा नसल्याने अग्निशमन दलाच्या मोठ्या वाहनांना आणि शिडीच्या यंत्रणेला घटनास्थळी पोहोचताना अडचणी आल्या. त्यामुळे उंच मजल्यांवर अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी जवानांना मोठे प्रयत्न करावे लागले. नागरिक मदतीसाठी हाका मारत असताना पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू ठेवलं. अखेर सुमारे 20 ते 25 रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं. या दुर्घटनेनंतर इमारतीतील अग्निसुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उंच इमारतींमध्ये आग विझवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सुटका करण्यासाठी आवश्यक यंत्रणा असणं महत्त्वाचं असताना, प्रत्यक्ष बचावकार्यात अनेक अडथळे आल्याचं समोर आलं आहे.

इमारतीच्या अग्निसुरक्षेवर प्रश्नचिन्ह
इमारतीच्या परिसरात अग्निशमन दलाच्या वाहनांच्या हालचालींसाठी पुरेशी जागा होती का? इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती का? तसेच इमारतीचं नियमित फायर ऑडिट करण्यात आलं होतं का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. इमारतीला परवानगी देताना अग्निसुरक्षेच्या नियमांची योग्य तपासणी करण्यात आली होती का, याचीही चौकशी होणं आवश्यक आहे.दरम्यान, आगीमुळे बाधित झालेल्या रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात जवळील रिजेन्सी हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आगीचं नेमकं कारण काय होतं, अग्निशमन यंत्रणा कार्यरत होती का आणि सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यात आलं होतं का, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.



