धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मध्य रेल्वेच्या २४ विशेष गाड्या

नागपूरसह अकोला, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नाशिक रोडसाठी विशेष रेल्वे सेवा
मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे जाणाऱ्या अनुयायांची आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २४ विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, अकोला आणि भुसावळ या मार्गांवरून नागपूरसाठी या विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये आरक्षित तसेच अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. या निमित्ताने नागपूर येथे मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होत असल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे.
कोणत्या मार्गांवर धावणार विशेष गाड्या?
- नागपूर–अकोला–नागपूर : ४ सेवा
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–नागपूर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : ६ सेवा
- पुणे–नागपूर–पुणे : ४ सेवा
- सोलापूर–नागपूर–सोलापूर : २ सेवा
- नागपूर–भुसावळ–नागपूर : ४ सेवा
- नाशिक रोड–नागपूर–नाशिक रोड : ४ सेवा
मुंबईहून नागपूरसाठी विशेष गाड्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १८, १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी विशेष अनारक्षित गाड्या सुटणार आहेत. या गाड्या दुसऱ्या दिवशी नागपूरला पोहोचतील. परतीच्या प्रवासासाठी नागपूरहून १९, २० आणि २२ ऑक्टोबर रोजी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा आणि वर्धा यांसह विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
पुणे, सोलापूर आणि नाशिकहूनही सुविधा
पुणे–नागपूर मार्गावर १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी, तर सोलापूरहून १९ ऑक्टोबर रोजी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे. नाशिक रोडहून १८ आणि २० ऑक्टोबर रोजी नागपूरसाठी १२ डब्यांची मेमू विशेष गाडी धावेल. नागपूरहून परतीच्या गाड्याही नियोजित तारखांना सोडण्यात येणार आहेत.
नागपूर–अकोला मार्गावर २० आणि २१ ऑक्टोबर रोजी आरक्षित विशेष गाड्या धावणार आहेत. तसेच नागपूर–भुसावळ मार्गावर २० आणि २१ ऑक्टोबर रोजी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
तिकीट आरक्षण आणि वेळापत्रक
नागपूर–अकोला–नागपूर या आरक्षित विशेष गाड्यांचे तिकीट आरक्षण संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अनारक्षित गाड्यांची तिकिटे यूटीएस प्रणालीद्वारे किंवा रेलवन ॲपवरून काढता येतील.



