मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना वाचून दाखवणार संविधानाचा धडा

मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, मूलभूत कर्तव्ये, सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांची जाणीव रुजविण्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ‘सुजाण नागरिक-सक्षम भारत’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आज शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वतः विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचून दाखवणार असल्याची माहिती आहे.
दादर पश्चिम येथील भवानी शंकर मार्गावरील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, नागरिक म्हणून असलेली जबाबदारी आणि लोकशाही व्यवस्थेतील मूल्यांची ओळख करून दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमात ‘स्मार्ट नागरिक’ आणि ‘विद्यार्थी प्रेरणा’ या पुस्तिकांचेही प्रकाशन करण्यात येणार आहे. शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना संविधानातील तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्यांची माहिती मिळावी, तसेच सामाजिक समता आणि न्यायाची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री आशिष शेलार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची विशेष उपस्थिती असेल.
याशिवाय खासदार अनिल देसाई, आमदार अमित साटम, महेश सावंत, सुनील शिंदे आणि राजहंस सिंह यांच्यासह मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, विविध पक्षांचे गटनेते, समित्यांचे अध्यक्ष आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये संविधाननिष्ठा आणि लोकशाही मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने या उपक्रमाकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.



