BEST BUS ACCIDENT छेडानगर सिग्नलवर बेस्ट बस-टँकरची धडक; दोन महिलांसह चार प्रवासी जखमी

मोटारसायकल अचानक समोर आल्याने बसचालकाने लावले ब्रेक; टँकरच्या धडकेत बसच्या तीन खिडक्यांच्या काचा फुटल्या
मुंबई : घाटकोपर पूर्वेकडील छेडानगर सिग्नल येथे आज बुधवारी सकाळी बेस्ट बस आणि टँकर यांच्यात अपघात झाला. सकाळी ६.५५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात चार प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोन महिलांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघींनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड आगाराची बेस्ट बस (क्रमांक एमएच-०३-सीव्ही-७०३५) मार्ग क्रमांक ए-३७३/३२ वरून वैशाली नगर येथून माहूलच्या दिशेने जात होती. छेडानगर सिग्नलजवळ अचानक एक मोटारसायकल बससमोर आल्याने चालकाने तातडीने ब्रेक लावून बस थांबवली. त्याचवेळी मुंबईहून वाशीकडे जाणाऱ्या टँकरची बसच्या उजव्या बाजूच्या मधल्या भागाला धडक बसली.
या धडकेमुळे बसच्या उजव्या बाजूच्या तीन खिडक्यांच्या काचा फुटल्या. यामध्ये चार प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बसच्या वाहकाने दोन महिला प्रवाशांना तातडीने राजावाडी रुग्णालयात नेले. भाग्यश्री खेडकर (१४) आणि आदिती कोयांडे (२२) अशी त्यांची नावे असून, दोघींनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, अन्य एका किरकोळ जखमी प्रवाशाने रुग्णालयात उपचार घेण्यास नकार दिला, तर दुसऱ्या जखमी प्रवाशाला त्याच्या नातेवाइकांनी अन्य रुग्णालयात नेले.



