मुंबई

अनिक डेपोतील बस आगीची चौकशी; मानवी चुकीचा संशय

मुंबई : बेस्टच्या अनिक डेपोमध्ये दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत बेस्टच्या १२ बस जळून खाक झाल्याच्या घटनेने बेस्ट प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही आग नेमकी अपघातामुळे लागली की मानवी चुकीमुळे, याबाबत बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला देण्यात आले आहेत.

बैठकीत देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळालेल्या बसपैकी एका बसमधील गॅस सिलिंडरला गळती झाली असावी आणि त्यानंतर ठिणगी पडल्याने आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आगीने काही वेळातच शेजारी उभ्या असलेल्या इतर बसनाही कवेत घेतले. जळालेल्या १२ बसपैकी सहा बस नवीन असून त्यांची नोंदणीही झालेली नव्हती.

आग लागल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही बस आतून बंद असल्याने त्या वेळेत बाहेर काढता आल्या नाहीत आणि त्यामुळे आग इतर बसपर्यंत पोहोचल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

गॅस हस्तांतरणादरम्यान आग लागल्याचा आरोप

बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी या घटनेत मानवी चुकीची शक्यता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका बसमधील गॅस दुसऱ्या बसच्या टाकीत रिकामा करण्याचे काम सुरू असतानाच आग लागली. कंत्राटदाराकडून काही बाबी लपवल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डेपोमध्ये उभ्या असलेल्या आणि कुलूपबंद बसच्या चाव्या नेमक्या कोणाकडे होत्या, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नांदगावकर यांनी केली. नवीन आणि नोंदणी न झालेल्या बसना आग कशी लागली, याचा तपास सखोलपणे करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कंत्राटदारावर कारवाईचे संकेत
घटनेच्या चौकशीत कंत्राटदाराची निष्काळजीपणा किंवा मानवी चूक आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. मात्र, आगीचे नेमके कारण अधिकृत चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वास राव यांनी सांगितले की, प्रत्येक बेस्ट डेपोमध्ये अग्निशमन दलाची वाहने तैनात करण्याची मागणी करणारे पत्र महापौर आणि पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच अनिक डेपोतील आगीबाबतचा सविस्तर अहवाल पुढील बेस्ट समितीच्या बैठकीत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

Related Articles

Back to top button