INDIA Bloc: INDIA आघाडी आज मैदानात – ज्ञानेश कुमारला हटवणार की स्वतःच फुटणार?

प्रशांत गोडसे
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावरून INDIA आघाडी आज दिल्लीत शक्तिप्रदर्शन करणार आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या बैठकीत SIR, मतदार यादी आणि ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी यांच्यासह प्रमुख विरोधी नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड प्रत्यक्ष सहभागी होतील, तर जेष्ठ नेते शरद पवार,उद्धव ठाकरे ऑनलाइन सहभागी होणार आहेत.
आघाडीची ताकद की समन्वयाची परीक्षा?
ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावर विरोधकांची भूमिका जवळ येत असली, तरी INDIA आघाडीतील पूर्ण एकमताचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव बैठकीला उपस्थित राहणार नसून पक्षाचा प्रतिनिधी सहभागी होईल. AAP आणि DMK देखील बैठकीपासून दूर आहेत.
म्हणजेच मुद्दा समान असला तरी व्यासपीठ एकच नाही, हीच आघाडीसमोरील मोठी अडचण आहे.
सरकारवर दबाव आणण्याची तयारी
बैठकीत ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील हटविण्याच्या प्रस्तावासाठी खासदारांच्या स्वाक्षऱ्या, देशव्यापी आंदोलन आणि संयुक्त कार्यक्रम यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. SIR आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात विरोधकांचा आवाज अधिक तीव्र करण्याची तयारी आहे.
सरकारवर दबाव वाढवायचा असेल तर विरोधकांना आधी आपला समन्वय मजबूत करावा लागणार आहे. त्यामुळे आजची बैठक केवळ सरकारविरोधातील रणनीती ठरवणारी नाही, तर INDIA आघाडीची प्रत्यक्ष एकजूट किती आहे, हे दाखवणारीही ठरणार आहे.
आजची खरी कसोटी
एकीकडे काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे शिवसेना), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि इतर घटक पक्ष एकत्र येत आहेत. दुसरीकडे काही प्रमुख पक्षांची अनुपस्थिती कायम आहे.
एकंदरीत, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत. मात्र आघाडीतील पूर्ण एकोपा आणि समन्वयाचा अभाव जाणवत आहे. सरकारला मागे हटवायचे असेल तर आघाडीला स्वतःचे अंतर मिटवणेही तितकेच गरजेचे आहे.ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावर विरोधकांचा सूर एक आहे; आता कृतीतही तेवढाच समन्वय दिसणार का हे पाहणे महत्त्वाचे असणारा.



