वेलकम’, ‘गदर’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन; चित्रपटसृष्टीत शोककळा

मुंबई – ‘वेलकम’, ‘गदर : एक प्रेम कथा’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ यांसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने छाप उमटवणारे अभिनेते मुश्ताक खान यांचे गुरुवारी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते.
मुश्ताक खान गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मुंबईमधील नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे वृत्त आहे.
मुश्ताक खान यांनी आपल्या कारकिर्दीत प्रामुख्याने सहाय्यक आणि विनोदी भूमिका साकारल्या. ‘वेलकम’मधील त्यांची भूमिका विशेष गाजली. ‘गदर : एक प्रेम कथा’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले होते.
त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच चित्रपट आणि कॉमेडी क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. पडद्यावर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या कलाकाराच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.



