मनोरंजन

Vidyut Jammwal : विद्युत जामवालने 15 मिनिटं रोखला श्वास; डोळ्यांत आले पाणी, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल आपल्या जबरदस्त फिटनेस, मार्शल आर्ट्स कौशल्य आणि योगाभ्यासासाठी प्रसिद्ध आहे. तो सोशल मीडियावरही सक्रिय असून, अनेकदा आपल्या फिटनेस आणि योगसाधनेचे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. आता त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबईत ‘स्ट्रीट फायटर’च्या एका विशेष कार्यक्रमाला विद्युत जामवालने हजेरी लावली होती. यावेळी त्याने उपस्थितांसमोर आपल्या योगसाधनेचं अनोखं प्रात्यक्षिक सादर केलं. विद्युतने तब्बल 15 मिनिटे श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न केला. या प्रात्यक्षिकादरम्यान तो पूर्णपणे स्थिर बसलेला दिसत होता.

मात्र, काही वेळानंतर त्याच्या शरीरात थरथर जाणवू लागली आणि डोळ्यांत पाणीही आलं. विद्युतची ही अवस्था पाहून कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रेक्षकही काही क्षण चिंतेत पडले. मात्र, त्याने आपली साधना पूर्ण केली. या संपूर्ण प्रात्यक्षिकाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडून त्याच्या फिटनेस आणि आत्मनियंत्रणाचं कौतुक केलं जात आहे.

‘स्ट्रीट फायटर’मधील भूमिकेशी खास कनेक्शन

विद्युत जामवालने ‘स्ट्रीट फायटर’मध्ये धल्सिम या लोकप्रिय गेमिंग पात्राची भूमिका साकारली आहे. या पात्राचा संबंध योग आणि आध्यात्मिक साधनेशी जोडलेला आहे. त्यामुळे चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या गुणवैशिष्ट्यांशी स्वतःच्या योगसाधनेचा संबंध जोडत विद्युतने हे विशेष प्रात्यक्षिक सादर केल्याचं सांगितलं जात आहे.

पतंजलीच्या योगसूत्रांचा उल्लेख

मेडिटेशन पूर्ण केल्यानंतर विद्युतने आपल्या साधनेबद्दलही माहिती दिली. त्याने पतंजलींच्या योगसूत्रांमधील एका विशेष तंत्राचा सराव केल्याचा उल्लेख केला. या साधनेमुळे आयुष्यातील अनेक महत्त्वाचे टप्पे गाठण्यास आपल्याला मदत झाल्याचंही त्याने सांगितलं.विद्युतच्या मते, योग हा केवळ शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी नसून, मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठीही महत्त्वाचा आहे. आयुष्यात पुढे जाताना आत्मनियंत्रण आणि शांत राहण्याची क्षमता आवश्यक असल्याचं त्याने यावेळी सांगितलं.

तरुणांना दिला खास संदेश

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण काहीतरी मिळवण्याच्या शर्यतीत सहभागी झाला आहे. सतत परिणामांचा विचार करण्याऐवजी काही क्षण स्वतःसाठी थांबणं आणि शांत राहणं गरजेचं असल्याचं विद्युतने सांगितलं.तरुणांनी काही काळ स्वतःला थांबवून स्थिर राहण्याचा सराव करावा, असा सल्लाही त्याने दिला. विद्युतच्या या अनोख्या योगप्रात्यक्षिकामुळे त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

Related Articles

Back to top button