मनोरंजन

Ramayana Set Fire Mumbai Goregaon : ‘रामायण’च्या सेटवर आगीचं तांडव; धुराचे लोट, अनेक सेटचं नुकसान, नेमकं काय घडलं?

मुंबई :अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री साई पल्लवी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवर सोमवारी आगीची मोठी घटना घडली. मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या सेटवर अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे मोठे लोट आणि धुराचे ढग परिसरात पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे 4.02 वाजता ही आग लागली. सुरुवातीला तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या एका स्ट्रक्चरला आग लागली आणि काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर सुमारे 4.55 वाजता आग आटोक्यात आणण्यात आली.

नेमकं काय जळालं?

मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, आग सुमारे 100 बाय 20 फूट आकाराच्या पीसीआर युनिटपुरती मर्यादित होती. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन, केबल्स, दरवाजे, लाकडी प्लँक्स, एसी युनिट, प्लास्टिक साहित्य आणि शूटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या इतर वस्तूंचे नुकसान झाले आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे.दरम्यान, FWICEचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनीही या घटनेला दुजोरा दिल्याची माहिती समोर आली आहे.

इतर शोच्या सेटलाही फटका

‘रामायण’च्या सेटसोबतच याच परिसरात इतर काही रिअॅलिटी शोचे सेटदेखील होते. त्यामुळे आगीचा फटका इतर सेटनाही बसला. ‘धमाल विथ पती पत्नी और पंगा’ सीझन 2 या रिअॅलिटी शोचा सेटदेखील याच ठिकाणी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने त्यावेळी या सेटवर शूटिंग सुरू नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

याशिवाय ‘MTV Hustle’ या रिअॅलिटी शोच्या सेटलाही आगीचा फटका बसल्याची माहिती आहे. आगीमुळे सेट आणि शूटिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचे नुकसान झाले आहे.

जीवितहानी टळली

आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, ‘रामायण’ हा रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या या घटनेमुळे सध्या सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, आगीमागचे नेमके कारण काय, तसेच चित्रपटाच्या शूटिंगवर याचा किती परिणाम झाला आहे, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

Related Articles

Back to top button