मनोरंजन

विक्की कौशल आणि आलिया भट्टचा रॉयल अंदाज; मनीष मल्होत्रांच्या ‘मिझवान’ फॅशन शोमध्ये शोस्टॉपर

पंकज राणे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री आलिया भट्ट पुन्हा एकदा त्यांच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आले आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या ‘मिझवान वेल्फेअर फॅशन शो’मध्ये दोघेही शोस्टॉपर म्हणून रॅम्पवर उतरले. 26 सप्टेंबर रोजी मुंबईतील ताज लँड्स एंड येथे या खास फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या शोने 15 वर्षांचा टप्पा पूर्ण केला.मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेल्या आकर्षक पोशाखांमध्ये विक्की आणि आलियाने रॅम्प वॉक केला. दोघेही हातात हात घेऊन रॅम्पवर चालताना दिसले. कॅमेऱ्यासमोर त्यांनी एकापेक्षा एक स्टायलिश पोझ दिल्या. रॅम्पवर दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना आणि हसताना दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहत्यांकडून त्यांच्या ऑन-रॅम्प केमिस्ट्रीचे कौतुक होत आहे.

आलिया भट्टचा रॉयल लूक

या खास सोहळ्यासाठी आलिया भट्टने आयव्हरी आणि सिल्व्हर टोनचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्यावर बारीक चिकनकारी कशिदाकाम करण्यात आले होते. या लूकला तिने स्टेटमेंट डायमंड चोकर, इअररिंग्स आणि रिंग्सची जोड दिली.मोकळे केस आणि मिनिमल मेकअपमध्ये आलियाचा लूक साधा, एलिगंट आणि ग्लॅमरस दिसत होता. पारंपरिक पोशाखाला आधुनिक स्टाइलची जोड देत तिने या रॅम्प वॉकमध्ये रॉयल अंदाजाची झलक दाखवली.

विक्की कौशलचाही शाही अंदाज

दुसरीकडे, विक्की कौशलने मिडनाइट ब्लू आणि व्हाइट-कॉबाल्ट ब्लू टोनची शेरवानी परिधान केली होती. शेरवानीवर फ्लोरल चिकनकारी वर्क करण्यात आले होते. त्यासोबत त्याने स्टेटमेंट नेकलेस घातला होता.या एथनिक लूकमध्ये विक्कीचा अंदाज रॉयल आणि क्लासी दिसत होता. त्याचा हा पारंपरिक अवतार त्याच्या व्यक्तिमत्त्वाला चांगलाच साजेसा ठरला.

‘मिझवान’ फॅशन शोचे 15 वर्षे

‘मिझवान वेल्फेअर फॅशन शो’ हा केवळ फॅशन आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचा सोहळा नसून, उत्तर प्रदेशातील मिझवान गावातील महिला कारागिरांच्या पारंपरिक चिकनकारी कलेला मोठं व्यासपीठ देणारा उपक्रम आहे.

अभिनेत्री शबाना आझमी आणि मनीष मल्होत्रा हे या उपक्रमाशी दीर्घकाळापासून जोडलेले आहेत. शबाना आझमी यांचे वडील आणि प्रसिद्ध शायर कैफी आझमी यांनी मिझवान वेल्फेअर सोसायटीची सुरुवात केली होती. ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या पारंपरिक कौशल्याला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश होता.

यानंतर मनीष मल्होत्रा या उपक्रमाशी जोडले गेले आणि मिझवानमधील महिला कारागिरांच्या चिकनकारी कलेला फॅशनच्या जगात मोठे व्यासपीठ मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

‘लव्ह अँड वॉर’मध्ये दिसणार विक्की-आलिया

दरम्यान, विक्की कौशल आणि आलिया भट्ट लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर याचीही प्रमुख भूमिका आहे. तिन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत.चित्रपटातील रणबीर, आलिया आणि विक्की यांचे फर्स्ट लूक पोस्टर्स यापूर्वीच प्रदर्शित झाले आहेत. ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट 21 जानेवारी 2027 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू भाषेतही तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Back to top button