सायानी गुप्ताचा आंतरराष्ट्रीय सन्मान; iSAFF Canada 2026 मध्ये ‘Leadership in Film Award’सह ‘आसमानी’ला विशेष गौरव

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका सायानी गुप्ताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव iSAFF Canada 2026 मध्ये सायानीला ‘Leadership in Film Award 2026’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यासोबतच तिच्या ‘आसमानी’ या शॉर्ट फिल्मला ‘Excellence in Short Film Making – Honourable Mention’ हा विशेष गौरव मिळाला आहे.
अभिनयासोबतच दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सायानीसाठी हा सन्मान महत्त्वाचा मानला जात आहे. कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागेही केलेल्या तिच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याचं या पुरस्कारातून अधोरेखित होतं.
iSAFF Canada 2026 च्या माध्यमातून सायानीच्या सर्जनशील प्रवासाला मिळालेला हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. तिच्या शॉर्ट फिल्मला जगभरातून मिळणारा प्रतिसाद आणि या पुरस्कारामुळे तिच्या कामाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणखी व्यापक पोहोच मिळाली आहे.
सायानीच्या आनंदात आणखी भर पडली ती तिच्या ‘आसमानी’ या शॉर्ट फिल्मला मिळालेल्या ‘Excellence in Short Film Making – Honourable Mention’ या सन्मानामुळे. या चित्रपटाची दखल iSAFF सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात घेतली गेल्याने तिच्या दिग्दर्शनाच्या कामाचंही कौतुक झालं आहे.
हा पुरस्कार सोहळा iSAFF Honours Night & Red Carpet अंतर्गत २३ सप्टेंबर २०२६ रोजी व्हॅन्कुव्हर येथे पार पडला. याच वर्षाच्या सुरुवातीला सायानीला Harvard University SAA कडून ‘South Asian Person of the Year’ या सन्मानाने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर मिळालेला iSAFFचा हा सन्मान तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
भारतीय आणि दक्षिण आशियाई कथाकथनाला जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्याच्या तिच्या प्रयत्नांचीही या सन्मानातून दखल घेतली जात आहे.
दरम्यान, ‘आसमानी’चं पुढील कॅनडा स्क्रीनिंग IFFSA Toronto येथे होणार असून, या स्क्रीनिंगसाठी सायानी गुप्ता प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहे. त्यामुळे ‘आसमानी’च्या आंतरराष्ट्रीय प्रवासातील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.



