अभिनेता संजय दत्तचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना फोन

मुंबई: महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानची महाराष्ट्रातील नामांकित दहीहंडी मानली जाते. ठाण्यात आयोजित या दहीहंडीला विविध अभिनेते, राजकीय नेते, व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत असतात. या वर्षी देखील संजय दत्त, सुनील शेट्टी, सूर्यकुमार यादव या सारख्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली. प्रताप सरनाईक यांच्या मराठी सक्तीच्या पाश्वभूमीवर येणारा प्रत्येक सेलिब्रिटी मराठीत बोलत होता. परंतु जेव्हा संजय दत्त आला तेव्हा बोलतांना म्हणाला की, प्रताप भाई मी ६ वर्ष येरवड्यात राहून सुद्धा मला मराठी शिकता आले नाही. त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. अनेकांनी त्यावर टीका केली. काहींनी तर केवळ रिक्षा टॅक्सी वाल्यांनीच मराठी शिकायचे का असा सवाल उपस्थित केला.
प्रताप सरनाईक बैठकी असतांना अखेर संजू बाबाचा फोन खणखणला…
अखेर अभिनेते संजय दत्त याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन करून “प्रताप भाई, जय महाराष्ट्र….” अशी मराठीतून सुरवात केली. दहीहंडी कार्यक्रमात आपण केवळ मस्करी करत होतो, मला चांगली मराठी येते. माझ्या बोलण्याने काही चुकीचा संदेश गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. माझे कुटुंबीय हे मुंबईकर आहोत. मी याच मातीत वाढलो असून, महाराष्ट्राने मला भरभरून दिले असल्याचे तो म्हणाला.
शिवसेनाप्रमुखांचे उपकार!!!
संजय दत्त याने याप्रसंगी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढल्याचे समजते. आमच्या कठीण काळात साहेब माझ्या आणि कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे तो म्हणाला.



