Psycho Ranga Marathi Movie Review : ‘सायको रंगा’ रहस्य, रक्तरंजित अॅक्शन आणि रंगाचा काळोखा भूतकाळ

पंकज राणे
मुंबई : मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगळ्या धाटणीच्या कथा प्रेक्षकांसमोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेला ‘सायको रंगा’ हा सस्पेन्स आणि ड्रामा यांचा मिलाफ असलेला चित्रपट आहे. गुन्हेगारांचा खात्मा करणारा गूढ नायक, त्याच्याशी जोडलेलं रहस्य आणि एका पत्रकाराभोवती उलगडत जाणारी धोकादायक परिस्थिती, अशा चौकटीत चित्रपटाची कथा आकार घेते. मात्र, सुरुवातीची उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला हा चित्रपट पुढे जाताना काहीसा रुळलेल्या वाटेवर जातो.
नेमकी काय आहे कथा?
चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे रंगा. परिसरातील गुन्हेगारांचा नायनाट करणारा आणि गरजूंसाठी संरक्षणाची भूमिका बजावणारा रंगा सुरुवातीला एक गूढ व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येतो. दरम्यान, पत्रकार अदिती एका गंभीर आणि धोकादायक शहरी रहस्यात अडकते. तिच्या मदतीसाठी रंगा पुढे येतो आणि त्यानंतर त्याच्या भूतकाळाचे एक-एक पदर उलगडू लागतात.
रंगा केवळ गुन्हेगारांविरोधात लढणारा रक्षक आहे की त्याच्या व्यक्तिमत्त्वामागे आणखी काही काळोख दडलेला आहे, हा प्रश्न चित्रपट पुढे नेतो. त्याच्या भूतकाळाचा संबंध एका धोकादायक आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाशी असल्याचे हळूहळू समोर येते.
देवेंद्र चौगुले यांनी कथा लिहिली असून, देवेंद्र चौगुले, मनीष कुलकर्णी, उत्तम चोरडे आणि स्नेहलराज यांनी पटकथेची जबाबदारी सांभाळली आहे. कथेत काही ठिकाणी उत्सुकता निर्माण होते; मात्र अनेक प्रसंगांमध्ये चित्रपटाचा वेग मंदावतो. रहस्य आणि थरार टिकवून ठेवण्याची क्षमता पटकथेत सर्वत्र जाणवत नाही. काही प्रसंग रुळलेल्या पद्धतीने पुढे जात असल्याने प्रेक्षकांचं लक्ष सातत्याने कथेकडे खिळून राहत नाही. संवाद मात्र प्रसंगाला साजेसे असून, काही ठिकाणी प्रभावी ठरतात.
कलाकारांची कामगिरी कशी?
सुबोध भावे यांनी आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. स्मिता गोंदकर यांची कामगिरीही लक्षवेधी आहे. पुष्कर जोग यांनी आपली भूमिका चांगल्या पद्धतीने साकारली आहे. जान्हवी किल्लेकर यांची कामगिरी मात्र काहीशी मर्यादित वाटते.प्रकाश धोट्रे आपल्या भूमिकेत छाप पाडतात, तर आनंद काळे यांचा अभिनय सरासरी म्हणावा लागेल. मिलिंद शिंदे, अमोल नाईक आणि संजय मोहिते यांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका योग्य पद्धतीने साकारल्या आहेत. इतर कलाकारांनीही कथेला आवश्यक ते सहकार्य केलं आहे. विशेष म्हणजे, देवेंद्र चौगुले या चित्रपटात विविध भूमिकांमध्ये दिसतात.
अॅक्शन आणि संगीत जमेच्या बाजू
चित्रपटाच्या अॅक्शन आणि स्टंट सीन्समध्ये विशेष दम पाहायला मिळतो. उत्तम चोरडे यांचं संगीत श्रवणीय आहे, तर पार्श्वसंगीतही चित्रपटाच्या वातावरणाला साजेसं आहे. गाण्यांचं चित्रण आकर्षक पद्धतीने करण्यात आलं आहे.मल्हार जोशी आणि सैफ बर्गीर यांचं कॅमेरावर्क प्रसंगांना योग्य दृश्यात्मक आधार देतं. मात्र, चंद्रशेखर गुरव यांच्या संकलनात आणखी नेमकेपणा आणि वेगाची गरज जाणवते.देवेंद्र चौगुले यांच्या दिग्दर्शनातून कथेला अपेक्षित असलेला थरार काही ठिकाणी प्रभावीपणे समोर येतो. मात्र, एकूण मांडणीमध्ये फारसा वेगळेपणा जाणवत नाही. चित्रपटाचा विषय आणि नायकाचं गूढ व्यक्तिमत्त्व लक्षवेधी असलं तरी पटकथेतील काही रुळलेले प्रसंग या जमेच्या बाजूंवर मर्यादा आणतात.
पाहावा की नाही?
‘सायको रंगा’मध्ये सस्पेन्स, अॅक्शन आणि भावनिक संघर्षाचा मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कलाकारांची कामगिरी आणि अॅक्शन सीन्स काही प्रमाणात चित्रपटाची बाजू सांभाळतात. मात्र, कथानकात अपेक्षित असलेलं नवेपण आणि सातत्यपूर्ण थरार नसल्याने चित्रपट काही ठिकाणी रेंगाळतो.
गूढ नायकाभोवती फिरणाऱ्या कथा आणि अॅक्शनपट आवडणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटातील काही भाग भावू शकतात. मात्र, काहीतरी नवीन आणि वेगळं पाहण्याची अपेक्षा असलेल्या प्रेक्षकांना ‘सायको रंगा’ फारसा आश्चर्याचा धक्का देत नाही.
मुंबई समाचार मराठीकडून ‘सायको रंगा’ला ५ पैकी ३.५ स्टार.



