Prithvik Pratap : मित्रांसोबत रोड ट्रिप, दूरवर दिसल्या आगीच्या ज्वाळा; पृथ्वीक प्रतापचा थरारक अनुभव

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्ययात्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या कामासोबतच तो वैयक्तिक आयुष्यातील अनेक खास क्षण आणि अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच पृथ्वीकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने रोड ट्रिपदरम्यान आलेला एक थरारक अनुभव सांगितला आहे.
रात्रीच्या प्रवासात दिसल्या आगीच्या ज्वाळा
पृथ्वीक प्रताप आपल्या मित्रांसोबत रोड ट्रिपला गेला होता. रात्रीच्या वेळी डोंगर आणि वाहतं पाणी असलेल्या परिसरातून प्रवास करत असताना त्याला दूरवर काही आगीच्या ज्वाळा दिसल्या. हे दृश्य पाहून पृथ्वीकने कॅमेरा त्या दिशेने वळवत चाहत्यांना ते दृश्य दाखवलं.
“मित्रांनो, मी आणि माझा मित्र एका ठिकाणी रोड ट्रिप करत आलो. या ठिकाणी आम्हाला काहीतरी दिसलं आहे. मी दाखवतो, थांबा,” असं तो व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतो.
ज्वाळांच्या दिशेने पुढे गेले अन् अचानक पळत परतले
दूरवरून आगीच्या ज्वाळा दिसत असल्याने पृथ्वीक आणि त्याच्या मित्रांनी त्या ठिकाणी जाऊन नेमकं काय आहे, हे पाहण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओमध्ये ते नदीतून वाट काढत त्या दिशेने पुढे जाताना दिसतात.
“आम्ही तिथे जवळ जाऊन तिथे काय आहे ते बघणार आहोत. मित्रांनो, हा रस्ता आहे. आम्ही फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत,” असं पृथ्वीक सांगतो.
मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर पृथ्वीक आणि त्याचे मित्र अचानक घाबरून तिथून पळत परतताना दिसतात. त्यांना नेमकं काय दिसलं, याचा खुलासा पृथ्वीकने या व्हिडीओमध्ये केलेला नाही. त्यामुळे या घटनेमागचं नेमकं रहस्य काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस
पृथ्वीकचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच त्यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. “नेमकं काय होतं तिकडे?”, “जागा कुठली आहे?” असे प्रश्न अनेकांनी कमेंट्समधून विचारले आहेत.
तर एका चाहतीने, “मीसुद्धा किती घाबरत घाबरत बघत होते,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, पृथ्वीक आणि त्याच्या मित्रांना त्या ठिकाणी नेमकं काय दिसलं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.



