मनोरंजन

Paach Futaacha Bachchan Movie Trailer Launch : सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत ‘पाच फुटाचा बच्चन’चा ट्रेलर लाँच

पंकज राणे

मुंबई : कीर्तनातून प्रसिद्धी मिळवणाऱ्या एका तरुणीची कथा सांगणाऱ्या ‘पाच फुटाचा बच्चन’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर ट्रेलरमुळेही या चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ‘पाच फुटाचा बच्चन’ हा चित्रपट येत्या ९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पाच फुटाचा बच्चन’ची कथा एका तरुण कीर्तनकार मुलीभोवती फिरते. कोल्हापुरी भाषेतील कीर्तन आणि संतांचे अभंग यामुळे या मुलीची जनमानसात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. उंचीने पाच फूट असलेल्या या तडफदार मुलीला ‘पाच फुटाचा बच्चन’ म्हणून ओळखले जाते. या प्रमुख भूमिकेतून श्रुती मधुदीप मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.

अवघ्या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाच्या कथानकाची झलक पाहायला मिळते. कीर्तन या मराठी संस्कृतीशी जोडलेल्या विषयासोबतच नाट्यमय प्रसंग, भावनिक संघर्ष आणि विविध व्यक्तिरेखांची झलक ट्रेलरमध्ये दिसते. त्यामुळे चित्रपटात नेमकं काय घडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे ‘पाच फुटाचा बच्चन’ ही कथा यापूर्वी प्रायोगिक एकपात्री नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली होती. या नाटकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर त्याचे चित्रपटात रूपांतर करण्यात आले आहे. त्यामुळे नाटकानंतर आता या कथेचा रुपेरी पडद्यावरील प्रवास कसा असेल, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

ट्रेलर लाँच सोहळ्यात रितेश देशमुख यांनी चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. ते म्हणाले, “बच्चनच्या बाजूला उभं राहणं, मग ते सहा फुटाचा असो किंवा पाच फुटाचा, मला थोडी धाकधूक होती. महाराष्ट्राची संस्कृती जपणारा आणि पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणारा हा ‘पाच फुटाचा बच्चन’ चित्रपट आहे, हे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येतं.”

पहिल्या चित्रपटाच्या प्रवासाबद्दल बोलताना रितेश देशमुख यांनी कलाकारांना मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचे महत्त्वही अधोरेखित केले. “पहिला चित्रपट बनवताना तो कसा होतोय, हे आपल्याला माहीत नसतं. पण महत्त्वाचं असतं ते आपल्याला मिळणारी लोकांची साथ. ती अतिशय महत्त्वाची असते आणि मला वाटतं तुम्हाला ती लाभली आहे,” असे त्यांनी सांगितले.

राहुल कर्णिक आणि ऑर्फियस स्टुडिओज यांनी ‘पाच फुटाचा बच्चन’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौस्तुभ रमेश देशपांडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात श्रुती मधुदीप, गौरी नलावडे, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, क्षितिश दाते, पुष्कराज चिरपुटकर, आशय कुलकर्णी, ओमप्रकाश शिंदे, समीर पाटील आणि विनोद वणवे यांच्या भूमिका आहेत.

चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे, संकलन सौरभ प्रभुदेसाई, संगीत निरंजन पेडगावकर, तर गीतलेखन प्रदीप आवटे यांनी केले आहे.

टीझर आणि वेगळ्या शीर्षकानंतर आता ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची आणि व्यक्तिरेखांची अधिक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. कीर्तनाच्या पार्श्वभूमीवर साकारलेली ही कथा आणि कलाकारांचा अभिनय पाहण्यासाठी आता ९ ऑक्टोबरची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Related Articles

Back to top button