नुसरत भरूचाचा बालीमध्ये अपघात; मणक्याला फ्रॅक्चर, एअर एम्बुलेंसने मुंबईत दाखल

मुंबई : अभिनेत्री नुसरत भरूचा हिच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. इंडोनेशियातील बाली येथे झालेल्या अपघातात नुसरतच्या मणक्याला गंभीर फ्रॅक्चर झालं आहे. या अपघातानंतर तिच्यावर बालीतील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी तिला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईत आणण्यात आलं आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतरचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नुसरत भरूचा कामानिमित्त बालीला गेली होती. काम संपल्यानंतर तिने तिथेच काही दिवस सुट्टी घालवण्याचं ठरवलं होतं. मात्र, याचदरम्यान तिच्यासोबत दुर्दैवी घटना घडली. या अपघातात तिच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती तिच्या टीमने अधिकृत निवेदनाद्वारे दिली होती. अपघातानंतर तिला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू होते. पुढील वैद्यकीय तपासणीनंतर तिच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईत दाखल
नुसरतच्या प्रकृतीचं गांभीर्य लक्षात घेऊन तिच्या टीमने तिला बालीहून मुंबईत आणण्याची व्यवस्था केली. त्यानुसार एअर अॅम्ब्युलन्सने तिला मुंबईत आणण्यात आलं. मुंबईत दाखल झाल्यानंतर तिला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेतानाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये नुसरत ऑक्सिजन सपोर्टवर असल्याचं दिसत आहे. तिच्या कुटुंबीयांसह जवळचे मित्रही यावेळी तिच्यासोबत असल्याचं दिसत आहे.
मणक्यावर शस्त्रक्रिया होणार
नुसरतच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, दुखापतीचं स्वरूप आणि नियोजित शस्त्रक्रिया लक्षात घेता तिला पूर्णपणे बरी होण्यासाठी पुरेसा वेळ लागणार आहे. तिच्या शस्त्रक्रियेबाबत आणि पुढील उपचारांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या दुखापतीमुळे आगामी काही आठवड्यांतील तिच्या व्यावसायिक कामांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या कठीण काळात नुसरतच्या गोपनीयतेचा आदर करावा आणि तिला उपचारांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक वेळ द्यावा, अशी विनंती तिच्या टीमने केली आहे. तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या आणि लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे टीमने आभार मानले आहेत.
टायगर श्रॉफसोबत झळकणार नुसरत
नुसरत भरूचाने ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘छोरी’, ‘जनहित में जारी’ आणि ‘राम सेतू’ यांसारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नुकतच ती ‘उफ ये सियापा’ या चित्रपटात दिसली होती. आगामी काळात ती अभिनेता टायगर श्रॉफसोबत एका नव्या प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. मात्र, सध्या तिचं आरोग्य आणि उपचार यांनाच प्राधान्य दिलं जात आहे. नुसरत लवकरात लवकर बरी व्हावी, अशी तिच्या चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे.



