National Crush : सोशल मीडियावर तान्या मिश्रा चर्चेत; ‘नॅशनल क्रश’ म्हणून नेटकऱ्यांकडून कौतुक, जाणून घ्या कोण आहे अभिनेत्री?

मुंबई : सोशल मीडिया हे असं व्यासपीठ आहे, जिथे एखादा फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एखादा नवा चेहरा काही क्षणांतच चर्चेत येतो. सध्या तान्या मिश्रा (Tanya Mishra ) या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तिचे ग्लॅमरस फोटो आणि स्टायलिश अंदाज नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. विशेषतः तिच्या डोळ्यांचं सोशल मीडिया यूजर्सकडून मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे.

तान्याच्या फोटो आणि पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकरी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणताना दिसत आहेत. याआधी रश्मिका मंदाना, प्रिया प्रकाश वारियर आणि तृप्ती डिमरी यांसारख्या अभिनेत्रींसाठीही सोशल मीडियावर हा शब्द वापरण्यात आला होता. त्यामुळे आता तान्या मिश्रा नेमकी कोण आहे, तिची पार्श्वभूमी काय आहे आणि ती मनोरंजन क्षेत्रात काय काम करते, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
तान्या मिश्रा का आली चर्चेत?
तान्या मिश्रा सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तिच्या सौंदर्याबरोबरच डोळ्यांचंही नेटकरी विशेष कौतुक करत आहेत.
तान्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटला सुमारे 12 लाख फॉलोअर्स असल्याचं सांगितलं जात आहे. तिच्या लोकप्रियतेमुळेच सोशल मीडिया यूजर्सकडून तिला ‘नॅशनल क्रश’ असा अनौपचारिक टॅग दिला जात आहे.
अभिनय आणि मॉडेलिंगमध्येही काम
तान्या मिश्रा केवळ मॉडेलिंगपुरती मर्यादित नसून तिने अभिनय क्षेत्रातही काम केलं आहे. ‘गजनवी’ आणि ‘चेज’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली आहे. याशिवाय ‘चिड़िया उड़’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे.आता तान्या ‘सफर मोहब्बत का’ या आगामी म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे तिच्या पुढील प्रोजेक्टकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
बिहारच्या गया येथील आहे तान्या
तान्या मिश्रा मूळची बिहारमधील गया येथील आहे. तिचा जन्म 31 जानेवारी 1999 रोजी झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिने मगध विद्यापीठातून बी.कॉमची पदवी घेतल्याचं सांगितलं जातं.मॉडेलिंगच्या कारकिर्दीत तान्याने फेमिना, फिल्मफेअर आणि ग्राझिया यांसारख्या प्रसिद्ध मासिकांसाठी फोटोशूट केले आहेत. यामुळे मनोरंजन आणि फॅशन क्षेत्रात तिने स्वतःची ओळख निर्माण केली.
2014 मध्ये मिळाली पहिली मोठी ओळख
2014 मध्ये फेमिना मासिकाच्या एप्रिल-मे अंकाच्या मुखपृष्ठावर झळकल्यानंतर तान्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिने मॉडेलिंगसोबत अभिनय क्षेत्रातही काम करण्यास सुरुवात केली.
यानंतर 2019 मध्ये IAWA मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ती चौथी उपविजेती ठरली होती. त्यानंतरही तिने मॉडेलिंग आणि मनोरंजन क्षेत्रातील काम सुरू ठेवलं.दरम्यान, सोशल मीडियावर तान्या मिश्रा हिला ‘नॅशनल क्रश’ म्हटलं जात असलं, तरी हा कोणताही अधिकृत किताब नाही. सोशल मीडिया यूजर्सकडून एखाद्या लोकप्रिय अभिनेत्री किंवा मॉडेलला दिला जाणारा हा अनौपचारिक टॅग आहे. सध्या तान्याचे फोटो आणि तिच्या लूकची सोशल मीडियावर होत असलेली चर्चा यामुळे तिचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.



