Marathi Singer : साडी नेसून चक्क नदीत पोहली ‘ही’ मराठी गायिका; गणपती विसर्जनाचा Video व्हायरल

मुंबई : आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मराठमोळी गायिका मुग्धा वैशंपायन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या मुग्धाने यंदाच्या गणपती विसर्जनाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुग्धा चक्क साडी नेसून नदीत पोहताना दिसत आहे.
मुग्धा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. मुग्धा आणि तिचा पती, गायक प्रथमेश लघाटे, दरवर्षी आपल्या गावात गणेशोत्सव साजरा करतात. यंदाही त्यांनी मोठ्या उत्साहात बाप्पाची स्थापना केली होती.

गणपती विसर्जनाच्या वेळी मुग्धाने शूट केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओमध्ये काही जणी नदीतून चालत पुढे जाताना दिसतात. मात्र मुग्धा मागे राहते. त्यानंतर वेळ न दवडता ती थेट नदीत पोहायला सुरुवात करते. मुग्धाला पोहताना पाहून प्रथमेशही तिच्याशी संवाद साधताना दिसतो. “तू पोहत लवकर पोहोचलीस,” असं तो तिला म्हणतो.
हा व्हिडीओ शेअर करताना मुग्धाने आपल्या पोहण्याच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. तिने लिहिलं, “एवढी वर्ष विहीरीत पोहायची सवय होतीच.. पण यावर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी चक्क आरवलीच्या नदीत पोहोले! ती सुद्धा साडी नेसून. आणखी एक skill unlocked!”
मुग्धा यापूर्वीही तिच्या माहेरी विहिरीत पोहतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसली आहे. मात्र यावेळी साडी नेसून नदीत पोहतानाचा तिचा अंदाज चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून अनेकांनी तिच्या या अनोख्या अंदाजाचं कौतुक केलं आहे.मुग्धा आणि प्रथमेश हे दोघेही उत्तम गायक असून विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र सादरीकरण करताना दिसतात. त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आता मुग्धाचा गणपती विसर्जनाचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.



