मनोरंजन

Mrutyuchakra Marathi Movie Trailer Launch : ‘मृत्यूचक्र’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित; २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात

पंकज राणे

मुंबई : रहस्य, भय आणि नियतीच्या अनाकलनीय खेळाची गोष्ट सांगणाऱ्या ‘मृत्यूचक्र’ या मराठी सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमधील गूढ वातावरण, सिरीयल किलरची दहशत, हॉस्पिटलमधील प्रसंग आणि मानवी आकलनापलीकडील घटनांनी चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.‘मृत्यूचक्र’च्या ट्रेलर लाँच सोहळ्याला सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे विश्वस्त राजाराम देशमुख, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री महादेव फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर निर्मित या चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे. विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू-गंगावणे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.ट्रेलरमध्ये एका रहस्यमय चक्राची चाहूल, प्राचीन वास्तू, अंधाराचे सावट, सिरीयल किलर आणि भीतीदायक वातावरण पाहायला मिळते. हॉस्पिटलमधील दृश्यांसोबतच वैद्यकीय वास्तव आणि मानवी आकलनापलीकडील गूढ शक्ती यांच्यातील संघर्षाची झलकही ट्रेलरमध्ये दिसते. ‘सुरुवात तिथेच होते, जिथे शेवट झाला होता… चक्र मृत्यूचे – मृत्यूचक्र’ हा संवाद चित्रपटाच्या कथानकाबद्दल उत्सुकता निर्माण करतो.

चित्रपटाच्या कथानकात मृत्यू, कर्म आणि मानवी अस्तित्वाशी संबंधित काही गूढ प्रश्न मांडण्यात आले आहेत. ‘प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली…’ या वाक्यामुळे चित्रपटाभोवतीचे रहस्य आणखी गडद होताना दिसते.चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितले की, ‘मृत्यूचक्र’ केवळ रहस्य आणि थरारावर आधारित नसून मृत्यू, कर्म आणि मानवी अस्तित्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न आहे. ट्रेलरमधून कथानकाची केवळ झलक दाखवण्यात आली असून चित्रपटातील अनेक महत्त्वाचे धागे प्रेक्षकांपासून जाणूनबुजून लपवण्यात आले आहेत.

या चित्रपटात शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले, संजय शेजवळ, शलाका गाडे, शरा गायकवाड, जितेंद्र पोळ आणि अनिल रबाळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.चित्रपटाची मूळ कथा डॉ. सुधीर निकम यांची असून पटकथा आणि संवाद विलास वाघमोडे व डॉ. सुधीर निकम यांनी लिहिले आहेत. रोहन शहा हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. जयेश मिस्त्री यांच्या यूजेएम नेटवर्क्स अँड एंटरटेनमेंट एलएलपीच्या माध्यमातून चित्रपटाचे महाराष्ट्रभर वितरण केले जाणार आहे.

चित्रपटाला केदार दिवेकर यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. वलय मुळगुंद यांच्या गीतांना सुहास सावंत आणि शमिका भिडे यांनी आवाज दिला आहे. निशांत भागवत यांनी छायांकन, तर राहुल भातणकर यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. मयूर पवार हे प्रोडक्शन डिझायनर असून कुणाल वेदपाठक यांनी कला दिग्दर्शन केले आहे. किर्ती जंगम जोशी यांनी वेशभूषा, तर संतोष गायके यांनी रंगभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.रहस्य, भय आणि थरार यांची सांगड घालणारा ‘मृत्यूचक्र’ आता २३ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Related Articles

Back to top button