Miranda Warning Marathi Movie: जान्हवी किल्लेकर दिसणार नव्या थरारक भूमिकेत; ‘मिरांडा वॉर्निंग’ची उत्सुकता वाढली

मुंबई : मालिका आणि चित्रपटांमधील अभिनयामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आता एका वेगळ्या आणि रंजक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जान्हवी आगामी ‘मिरांडा वॉर्निंग’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत असून, हा चित्रपट 27 नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
सतनाम फिल्म्स स्टुडिओ आणि ओपन गेट मुव्हीज यांच्या माध्यमातून ‘मिरांडा वॉर्निंग’ची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन धोत्रेयांनी चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंटचे सुशीलकुमार अग्रवाल आणि सुकल्प चित्रचे कल्पक जोशी यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. रवींद्र मठाधिकारी आणि सायली मठाधिकारी यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे.
नेमकं रहस्य काय?
‘हेरिटेजवाडी’ नावाच्या फार्महाऊसवर एका खुनाची घटना घडते. या घटनेनंतर सुरू होणाऱ्या थरारक तपासाभोवती चित्रपटाची कथा फिरते. या तपासादरम्यान कोणती रहस्ये उलगडतात, कोणती नवी कोडी समोर येतात आणि या सगळ्यामागचं नेमकं सत्य काय आहे, हे चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात आदिनाथ कोठारे एका रफटफ पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. सस्पेन्स आणि थ्रिलरच्या पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या या कथेत कलाकारांच्या भूमिका आणि कथानकातील रहस्य यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
जान्हवीची नवी भूमिका चर्चेत
जान्हवी किल्लेकरने ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेसह ‘सायको रंगा’सारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली आहे. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. आता ‘मिरांडा वॉर्निंग’च्या माध्यमातून ती पुन्हा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
विशेष म्हणजे, सस्पेन्स थ्रिलरच्या पार्श्वभूमीवर जान्हवीची भूमिका नेमकी कशी असेल, याबाबत निर्मात्यांनी सध्या फारशी माहिती समोर आणलेली नाही. त्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.सचिन धोत्रे यांनी यापूर्वी 2023 मध्ये ‘गेट-टुगेदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आता ‘मिरांडा वॉर्निंग’च्या माध्यमातून त्यांनी सस्पेन्स-थ्रिलर प्रकारात वेगळा प्रयोग केला आहे. त्यामुळे 27 नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या रहस्यमय कथेची उकल होणार आहे.



