मनोरंजन

Sahal Marathi Movie Trailer Release : शाळेच्या सहलीच्या आठवणींना उजाळा देणारा ‘सहल’ चित्रपट; 9 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

पंकज राणे

मुंबई : शाळेची सहल म्हटलं की धमाल, मस्ती, मित्रमैत्रिणींसोबतचे किस्से आणि अनेक गमतीजमती आठवतात. याच शालेय आठवणींना रुपेरी पडद्यावर घेऊन येणारा ‘सहल’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला असून, 9 ऑक्टोबर रोजी ‘सहल’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

के. स्वामिनी फिल्म प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मुकुंद वसंत खुपेरकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती प्रशांत केसरकर आणि विलास केसरकर यांनी केली असून, मुकुंद वसंत खुपेरकर हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ पटकथाही त्यांनीच लिहिली आहे.

‘सहल’मध्ये देविका दफ्तरदार, सिद्धेश मुकुंद खुपेरकर, कल्याणी अडसुळ, आदित्य खुपेरकर, प्रज्वल सुतार, सेजल कोरे, सचिन मोरे, शिवाजी पाटील आणि रवि कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिद्धेश मुकुंद खुपेरकर या चित्रपटातून मुख्य नायक म्हणून पदार्पण करत आहे. यापूर्वी त्याने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत सूरजची भूमिका साकारली होती. तसेच डॉ. केशव हेगडेवार यांच्या बालपणीची भूमिकाही त्याने साकारली आहे.

गणपतीपुळेच्या सहलीभोवती फिरणारी कथा

‘सहल’ची कथा एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणपतीपुळे सहलीभोवती फिरते. सहलीला जाण्यासाठी पैसे आवश्यक असतात; मात्र पालकांचा आर्थिक विरोध, विद्यार्थ्यांमधील अंतर्गत संघर्ष, मैत्री आणि मुलींविषयीच्या आकर्षणातून निर्माण होणारे वाद अशा विविध प्रसंगांमधून कथा पुढे जाते.

शालेय जीवनातील निरागसपणा, समज-गैरसमज, त्या वयातील उत्साह, मित्रमैत्रिणींमधील नातेसंबंध आणि पहिल्या आकर्षणाचा अनुभव या सगळ्यांचा चित्रपटात वेध घेण्यात आला आहे. त्यामुळे आज पालक असलेल्या प्रेक्षकांनाही आपल्या शाळेच्या दिवसांच्या आठवणींमध्ये घेऊन जाणारी ही कथा ठरणार आहे.विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक, शिक्षक आणि आजूबाजूचे वातावरण यांची भूमिका महत्त्वाची असते. याच पैलूंनाही चित्रपटाच्या कथेतून अधोरेखित करण्यात आले आहे. शालेय जीवनातील विविध भावविश्व आणि नातेसंबंधांना दमदार अभिनयाची साथ मिळाल्याचे ट्रेलरवरून दिसून येते.

तांत्रिक टीमही दमदार

चित्रपटाचे छायांकन अभिषेक शेटे यांनी केले असून, संकलनाची जबाबदारी चंद्रशेखर गुरव यांनी सांभाळली आहे. सुहास मुंढे आणि समीर पठाण यांनी लिहिलेल्या गीतांना डॉ. जय भीम शिंदे यांनी संगीत दिले आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत.मुकुंद वसंत खुपेरकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. श्रेया चव्हाण यांनी वेशभूषा, आदित्य चव्हाण यांनी ध्वनिसंयोजन, तर प्रशांत कुंभार यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.शाळेच्या सहलीच्या निमित्ताने मैत्री, संघर्ष, निरागस प्रेम आणि पालक-विद्यार्थी नात्याची गोष्ट सांगणारा ‘सहल’ 9 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

Related Articles

Back to top button