Aadi Anant Marathi Movie : नात्यांच्या भावविश्वाची गोष्ट हसत-खेळत उलगडणार ‘आदि अनंत’; जेजुरीत पोस्टरचे अनावरण

मुंबई :काही नाती आपल्याला जन्मतः मिळतात, तर काही नाती आपण आयुष्याच्या प्रवासात कमावतो. प्रेम, जिव्हाळा, सहवास आणि भावनिक आधार अशाच नात्यांच्या विविध छटांची गोष्ट सांगणारा ‘आदि अनंत’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच जेजुरी येथे श्री खंडोबाचे आशीर्वाद घेत प्रदर्शित करण्यात आले.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf ) आणि संकर्षण कऱ्हाडे ( Sankarshan Karhade ) यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते पाहायला मिळते. एकाच्या कुशीत दुसरा विसावलेला दिसत असून, या दृश्यातून दोघांमधील आपलेपणा, विश्वास आणि भावनिक जवळीक अधोरेखित होते. त्यामुळे चित्रपटात नेमक्या कोणत्या नात्याची गोष्ट पाहायला मिळणार, याची उत्सुकता पोस्टरमधूनच निर्माण झाली आहे. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी असल्याने या कथेत हास्याचेही अनेक रंग पाहायला मिळणार आहेत.

दमदार कलाकारांची फौज
‘आदि अनंत’मध्ये अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यासोबत सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात माणसं जवळ असूनही त्यांच्यातील भावनिक अंतर वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आपल्या माणसांचा सहवास, प्रेम आणि आपलेपणा किती महत्त्वाचा असतो, याभोवती ‘आदि अनंत’ची कथा गुंफण्यात आली असल्याचे पोस्टरवरून जाणवते. कुटुंबातील नात्यांची ऊब, त्यातून निर्माण होणाऱ्या आठवणी आणि माणसांमधील भावनिक बंध या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसून येते.
महेश लिमये म्हणतात…
चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांनी ‘आदि अनंत’च्या भावविश्वाबद्दल सांगितले, “नात्यांमध्ये अनेकदा न बोलताही खूप काही सांगितलं जातं. एखाद्या नात्याची किंमत मोठ्या प्रसंगांपेक्षा छोट्या-छोट्या क्षणांत जाणवते. ‘आदि अनंत’च्या माध्यमातून हे भावविश्व पडद्यावर मोकळेपणाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.प्रत्येक पात्राच्या भावनांशी प्रेक्षकांनी स्वतःला कुठेतरी जोडावं, हा या चित्रपटामागचा प्रयत्न आहे.” निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे यांनीही चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली. त्यांच्या मते, ‘आदि अनंत’ ही प्रत्येकाच्या घरात आणि आयुष्यात घडणारी कथा आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आपल्या घरातील आणि आपल्या माणसांची आठवण येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
12 नोव्हेंबरला चित्रपटगृहात
पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुतया चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रविंद्र औटी आणि दर्शन शाह हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले असून, कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत.नात्यांमधील प्रेम, आपलेपणा, सहवास आणि भावनांना हसत-खेळत मांडणारा ‘आदि अनंत’ 12 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



