Maitreyan Marathi Movie : प्रेम, मैत्री आणि नात्यांचा गुंता; ‘मैत्रेया’चा टीझर प्रदर्शित

मुंबई / पंकज राणे : काही नाती शब्दांत सांगता येत नाहीत, तर काही नात्यांना नाव देणंही कठीण असतं. अशाच नात्यांचा वेगळा पैलू उलगडणाऱ्या ‘मैत्रेया’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या आयुष्यातील मैत्री, जवळीक, मस्ती आणि बदलत्या नात्यांची झलक पाहायला मिळते.एकमेकांच्या आयुष्यात खास जागा असलेल्या या व्यक्तिरेखांच्या नात्यांमध्ये एखादी नवीन व्यक्ती आल्यानंतर समीकरणं कशी बदलतात, याची उत्सुकता टीझर निर्माण करतो. सहज क्षण, मैत्री आणि भावनिक जवळीक यामधून प्रेम नेमकं कुठे सुरू होतं आणि मैत्री कुठे संपते, हा प्रश्न चित्रपटासमोर ठेवण्यात आला आहे.
लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांच्या मते, टीझरच्या शेवटी येणारं ‘एकीकडे प्रेम, एकीकडे मैत्री अन् एकीकडे मैत्रीत गोंधळलेलं प्रेम…’ हे वाक्य आर्जोयी, जय, साजिरी आणि निर्वाण यांच्या नात्यांमधील पेच अधोरेखित करतं. प्रेम आणि मैत्रीच्या सीमारेषेचा शोध चित्रपटातून घेतला जाणार आहे.निर्माते मनोज खळतकर यांनी ‘मैत्रेया’ हा तरुणाईच्या भावभावना, गंमत आणि सहजपणा यांचा अनुभव देणारा फॅमिली एंटरटेनर असल्याचं सांगितलं आहे.समर टाईम्स प्रॉडक्शन निर्मित आणि क्रांती रेडकर वानखेडे लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मनोज खळतकर यांनी केली आहे. अमन खळतकर सहनिर्माते आहेत. समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मैत्रेया’ २३ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.



