Magazine Marathi Movie : Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव आणि ‘घर’ शोधणारा ‘मॅगझिन’; टीझर प्रदर्शित

मुंबई – पंकज राणे : शहरात वाढलेला एक Gen Z तरुण, आयुष्यात काहीतरी वेगळं घडावं या शोधात आपल्या पूर्वजांच्या गावाकडे जातो आणि या प्रवासात माणसं, नाती, गावाचं जगणं आणि स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी त्याला मिळते. याच अनोख्या प्रवासाची झलक दाखवणाऱ्या शुभम संजय शेवडे लिखित-दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट मॅगझिन’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
टीझरमधून शहरापासून महाराष्ट्राच्या मातीतल्या जगापर्यंत आणि तिथून ‘घर’ या संकल्पनेचा नव्याने शोध घेणाऱ्या तरुणाची कथा समोर येते. घर म्हणजे केवळ चार भिंतींची जागा की माणसं, आठवणी आणि आपल्या मुळांशी जोडलेली भावना, असा प्रश्न चित्रपटातून मांडण्यात आला आहे.टीझरमध्ये निसर्ग, तरुणाई, मैत्री, गावाकडचं जगणं आणि काही अनपेक्षित प्रसंगांची झलक पाहायला मिळते. एका संवादातून समोर येणारा एक शब्द नायकाचं लक्ष वेधून घेतो आणि त्याच्या पुढील प्रवासाबाबत उत्सुकता निर्माण करतो.
‘मॅगझिन’मध्ये नव्या पिढीतील कलाकारांसोबत अनुभवी अभिनेते अतुल परचुरे, शिवाजी साटम आणि किशोर कदम महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. दिवंगत अभिनेते अतुल परचुरे यांचा मोठ्या पडद्यावरील हा शेवटचा चित्रपट ठरणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट विशेष ठरणार आहे.
चित्रपटात गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची संस्कृतीही पाहायला मिळणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतलेल्या शुभम संजय शेवडे यांचा हा पहिला मराठी फीचर चित्रपट आहे.Gen Z ची vibe, गावाकडचं जगणं, नाती आणि ‘घर’ या संकल्पनेचा शोध घेणारा मॅगझिन’ २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.



