Govinda And Komal Rani : गोविंदा-कोमलच्या लालबागच्या राजाच्या दर्शनाची चर्चा; अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण

मुंबई : अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या आगामी ‘रूपा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यातच २२ सप्टेंबर रोजी गोविंदा त्याची ‘रूपा’मधील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकरसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचल्याने चर्चांना उधाण आलं. दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या.विशेष म्हणजे, गोविंदाच्या काही तास आधी त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर गोविंदा पत्नीसोबत न जाता कोमलसोबत दर्शनाला गेल्याने सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.
गोविंदा आणि कोमल यांनी लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतला. यावेळी गोविंदाने अंतिम आरतीतही सहभाग घेतला. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली.
या चर्चांवर आता स्वतः गोविंदाने स्पष्टीकरण दिलं आहे. एएनआयशी बोलताना गोविंदाने सांगितलं की, ‘रूपा’ हा त्याचा बऱ्याच काळानंतरचा कमबॅक चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी तो लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होता. याआधीही करिश्मा कपूर आणि रवीना टंडनसोबत त्याने लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचं त्याने सांगितलं.गोविंदाने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही भाष्य केलं. आपल्याला कुटुंबापासून दूर करण्याचा आणि समाजातील प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्याने म्हटलं. तसंच, आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत असून व्यावसायिक नाती जपणं महत्त्वाचं असल्याचंही गोविंदाने स्पष्ट केलं.
“जरी आमचं अफेअर असेल तरी मी माझं काम करत आहे आणि व्यावसायिक संबंधही जपत आहे,” असं वक्तव्य गोविंदाने केल्याचं वृत्त आहे.दरम्यान, गोविंदाचा ‘रूपा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच काळानंतर गोविंदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत असल्याने या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.



