Garambicha Bapu : ‘धर्मवीर’नंतर प्रसाद ओक साकारणार आणखी एक दमदार व्यक्तिरेखा; ‘गारंबीचा बापू’चा फर्स्ट लुक समोर

पंकज राणे
मुंबई : अभिनेता प्रसाद ओक गेल्या काही वर्षांपासून विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेनंतर प्रसाद ओकच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली. त्यानंतर आता तो आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसाद ओकच्या आगामी ‘गारंबीचा बापू’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रसाद ओकला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याच सोहळ्यात त्याच्या १५०व्या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. संत तुकडोजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित ‘खंजिरीचे बोल’ या चित्रपटाचा फर्स्ट लुकही यावेळी दाखवण्यात आला होता. आता ‘खंजिरीचे बोल’नंतर प्रसाद ओक ‘गारंबीचा बापू’ या चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
प्रसाद ओक साकारणार ‘अफाट बापू’
श्री. ना. पेंडसे यांच्या गाजलेल्या कादंबरीवर आधारित ‘गारंबीचा बापू’ ही कथा कोकणच्या मातीत रुजलेली आहे. गारंबी गावातील बापू या बंडखोर आणि बेफिकीर तरुणाच्या आयुष्याभोवती ही कथा फिरते. गावातील सत्ताधारी अण्णा खोतच्या दहशतीला आव्हान देणारा बापू आपल्या बेधडक स्वभावामुळे ‘अफाट बापू’ म्हणून ओळखला जातो.
या भूमिकेसाठी प्रसाद ओकची निवड करण्यात आली आहे. बापूच्या व्यक्तिरेखेतील बंडखोरपणा, बेफिकीर वृत्ती आणि कलंदर स्वभाव प्रसाद ओक आपल्या अभिनयातून पडद्यावर उभा करणार आहे.
देविका दफ्तरदार साकारणार राधाची भूमिका
या चित्रपटात अभिनेत्री देविका दफ्तरदार राधाच्या भूमिकेत दिसणार आहे. बापूच्या आयुष्यात येणारी राधा ही कथेतील महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे. तर यतिन कार्येकर अण्णा खोतच्या भूमिकेत दिसणार असून, जयवंत वाडकर मुसा, शशी पेंडसे विठोबा आणि माधवी सोमण मावशीची भूमिका साकारणार आहेत.
कोकणच्या पार्श्वभूमीवर साकारला जाणार चित्रपट
हर्णै, मुरुड, आंजर्ले आणि मुर्डीपासून दापोलीपर्यंतचा कोकणचा परिसर या कथेचा महत्त्वाचा भाग आहे. कोकणची संस्कृती, गावचं वातावरण आणि इथल्या माणसांचं जगणं या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक गुरुप्रसाद यांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत ही कथा नव्या रूपात पडद्यावर आणली आहे.
गुरुप्रसाद फिल्म्स आणि विषय प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. जयसिंग हे छायांकनाची जबाबदारी सांभाळत असून, वैशाली सामंत यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, उर्मिला धनगर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातून चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
एकाधिकारशाहीविरोधातील संघर्ष आणि मानवी स्वभावाचे विविध पैलू मांडणारी ही कथा नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे प्रसाद ओक ‘बापू’च्या भूमिकेत कसा दिसणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.



