Bollywood Hindi Song : इम्रान हाशमी-जिनिलिया देशमुख पहिल्यांदाच एकत्र; रोमँटिक गाण्याची चर्चा

मुंबई : इम्रान हाशमी आणि हिमेश रेशमिया ही जोडी म्हटलं की ‘आशिक बनाया आपने’मधील लोकप्रिय गाणं आजही अनेकांच्या आठवणीत आहे. आता तब्बल काही वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. इम्रान हाशमीच्या आगामी ‘गनमास्टर जी9’( Gunmaaster G9) या चित्रपटातील ‘अफसाना बनाया आपने’( Afsaana Banaaya Aapne ) हे नवं गाणं रिलीज झालं असून, या गाण्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.
या गाण्यात इम्रान हाशमीसोबत अभिनेत्री जिनिलिया देशमुख दिसत आहे. इम्रान आणि जिनिलिया पहिल्यांदाच एकत्र काम करत असून, दोघांची केमिस्ट्री गाण्यात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या निमित्ताने इम्रान हाशमी आणि हिमेश रेशमिया ही जोडीही पुन्हा एकदा एकत्र आली आहे.इम्रान आणि हिमेश यांनी यापूर्वी ‘आशिक बनाया आपने’, ‘अक्सर’ आणि ‘दिल दिया है’ यांसारख्या चित्रपटांसाठी एकत्र काम केलं आहे. त्यांच्या गाण्यांना त्यावेळी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ‘अफसाना बनाया आपने’ प्रदर्शित होताच चाहत्यांनी जुन्या गाण्यांशी त्याची तुलना करण्यास सुरुवात केली.
‘अफसाना बनाया आपने’ या गाण्याला हिमेश रेशमिया आणि असीस कौर यांनी आवाज दिला आहे. गाण्याचं संगीत आणि शब्दही हिमेश रेशमिया यांचे आहेत. गाण्यातील ‘पहले तो मैं आशिक था, अफसाना अफसाना अफसाना बनाया आपने’ ही ओळ विशेष चर्चेत आली आहे.गाण्याला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल हिमेश रेशमियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘गनमास्टर जी9’मधील पहिल्या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते आणि आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे, असं हिमेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच चाहत्यांनी या गाण्यावर रील्स बनवून आपल्यासोबत शेअर कराव्यात, असं आवाहनही त्याने केलं आहे.
दरम्यान, ‘अफसाना बनाया आपने’ ऐकल्यानंतर २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटाच्या टायटल साँगची आठवण होत आहे. दोन्ही गाण्यांमध्ये काही साम्य जाणवत असलं तरी नव्या गाण्याला स्वतंत्र संगीताची मांडणी करण्यात आली आहे.आदित्य दत्त दिग्दर्शित ‘गनमास्टर जी9’ हा रोमँटिक ॲक्शन चित्रपट आहे. यात इम्रान हाशमी, जिनिलिया देशमुख आणि अपारशक्ती खुराना प्रमुख भूमिकेत आहेत. विशेष म्हणजे अभिनेत्री शबाना आझमी या चित्रपटात पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २७ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.



