‘द फिक्स’मधील एलनाझ नोरौझीच्या पहिल्या हॉलिवूड मुख्य भूमिकेचे अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक!

अभिनेत्री एलनाझ नोरौझी हिच्या हॉलिवूडमधील कारकीर्दीला ‘द फिक्स’ या चित्रपटामुळे महत्त्वाचे वळण मिळाले आहे. झॅकरी लेव्ही आणि लियाम नीसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला आणि गाय मोशे दिग्दर्शित हा अॅक्शन थ्रिलर सध्या अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, अमेरिकन समीक्षकांकडून चित्रपटासह एलनाझच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे.
‘सेक्रेड गेम्स’मधून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केल्यानंतर एलनाझने भारतासह विविध आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये काम केले. मात्र, ‘द फिक्स’मधील भूमिका तिच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. या चित्रपटातून तिने हॉलिवूड फीचर फिल्ममध्ये पहिली महिला मुख्य भूमिका साकारली आहे.
चित्रपटात एलनाझने झारा या इराणी-अमेरिकन महिलेची भूमिका साकारली आहे. टकर या पात्राला तेहरानमध्ये जाण्याची वेळ येते, तेव्हा त्याची पत्नी असल्याचे भासवण्यासाठी झाराची मदत घेतली जाते. कथानक पुढे सरकत असताना झारा टकरच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनते आणि तिची भूमिका पुढील घडामोडींमध्येही निर्णायक ठरते.
‘द हॉलीवूड रिपोर्टर’मधील आपल्या परीक्षणात ज्येष्ठ समीक्षक फ्रँक शेक यांनी एलनाझच्या अभिनयाचा विशेष उल्लेख करत तिच्या कामाचे कौतुक केले आहे. एलनाझ आणि झॅकरी लेव्ही यांच्यातील केमिस्ट्रीलाही समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पुरुषप्रधान अॅक्शन विश्वात झाराचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आणि तिची कथानकातील उपस्थितीही लक्षवेधी ठरल्याचे विविध परीक्षणांमधून समोर आले आहे.
एलनाझच्या या भूमिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे वैयक्तिक आणि सांस्कृतिक नाते. इराणमध्ये जन्मलेल्या एलनाझने मोठ्या प्रमाणावर इराणमध्ये घडणाऱ्या या हॉलिवूड थ्रिलरमध्ये इराणी-अमेरिकन महिलेची भूमिका साकारली आहे. त्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेला वेगळा संदर्भ आणि वैयक्तिक जवळीक लाभते.
तेहरानमध्ये जन्म, जर्मनीत बालपण आणि त्यानंतर भारतात अभिनेत्री म्हणून घडलेली कारकीर्द असा एलनाझचा प्रवास राहिला आहे. आता ‘द फिक्स’मधून तिने हॉलिवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून नवी सुरुवात केली आहे.
‘द फिक्स’ सध्या अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून, ऑक्टोबरच्या अखेरीस भारतातही त्याचे प्रदर्शन होणार आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षकांना एलनाझ नोरौझीची हॉलिवूडमधील पहिली महिला मुख्य भूमिका मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.



