मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते, नटसम्राट नाना पाटेकर यांच्या निधनाने व्यक्तिगत हानी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणाऱ्या, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणाऱ्या व प्रखर सामाजिक जाणिवा जपणाऱ्या नाना पाटेकर यांचे अकल्पित निधन हा चित्रपटसृष्टीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. गेल्याच आठवड्यात अनंत चतुर्थीच्या दिवशी नानांच्या पुण्याच्या घरी गणपती दर्शनाच्या वेळेस झालेली भेट ही शेवटची ठरली, अशी शोकभावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त करताना नानांच्या आठवणींना उजाळा दिला.

उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणाले, नाना पाटेकर हे अभिनयाची एक जिवंत शाळा होते. ‘नटसम्राट’ चित्रपटातील त्यांचे संवाद आजही प्रेक्षकांच्या कानात घुमतात. चित्रपटाच्या पडद्यावर ते जितके भारदस्त असायचे, तितकेच खऱ्या आयुष्यात ते अत्यंत साधे आणि जमिनीवर असणारे व्यक्ती होते.

नाना पाटेकर यांनी ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी केलेले काम विशेष उल्लेखनीय आहे. संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला. समाजातील सामान्य माणसाशी त्यांची नाळ कायम जोडलेली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल त्यांना असलेली तळमळ आणि मदतीसाठी त्यांनी केलेले काम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

नाना पाटेकर यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पुण्यातील त्यांच्या घरी गणपती दर्शनाला मी दरवर्षी जायचो. नानांचे आदरातिथ्य मनमिळाऊ स्वभाव जवळून अनुभवता यायचा. त्यांच्याशी गप्पा मारणे आणि त्यांचे मार्गदर्शन घेणे हा नेहमीच एक सुखद अनुभव राहिला आहे. आमच्या दरे येथील निवासस्थानी नानांनी भेट दिली होती शेतीची पाहणी केली गाळ उपसण्याच्या कामासाठी देखील ते आले होते. खासगी भेटीत ते माझ्या पाठीवर हात ठेवून “काय क्रांतिवीर…” अशी त्यांनी दिलेली साद आणि ती कौतुकाची थाप मी कधीच विसरू शकत नाही. त्या शब्दांनी जनतेसाठी अधिक काम करण्याची ऊर्जा दिली, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी नानांच्या आठवणींना उजाळा दिला.

आपल्या कलेचा उपयोग समाजासाठी करणारे ते एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. रंगभूमी, मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या दमदार अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. ‘नटसम्राट’सारख्या भूमिकेतून त्यांनी अभिनयाची ताकद दाखवून दिली. नाना पाटेकर यांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान आणि त्यांचे सामाजिक कार्य नव्या पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील.
नाना पाटेकर हे केवळ उत्तम अभिनेते नव्हते, तर त्यांच्या अभिनयातील सहजता, आवाजातील ताकद आणि भूमिकेत पूर्णपणे झोकून देण्याची वृत्ती कायम स्मरणात राहील.

नानांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या अभिनयाने आणि सामाजिक कार्याने त्यांनी निर्माण केलेले स्थान कायम राहील.

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला आहे. मी एक सच्चा, दिलदार मित्र गमावला आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. त्यांच्यासारखा अभिनेता शतकातून एकदाच जन्माला येतो. काश्मीरमधील मुलांसाठी शाळा सुरू करण्याचं त्यांचं अखेरचं स्वप्न होतं, ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. तीच नाना पाटेकर यांना खरी श्रद्धांजली ठरेल. नानांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले.

Related Articles

Back to top button