मनोरंजन

‘धाकट्या सूनबाई’ मालिकेबद्दल महेश कोठारे, मंदार जाधव, चिन्मयी मोरे आणि सविता मालपेकर यांनी सांगितली खास गोष्ट

झी मराठीवर २८ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी नवी मालिका ‘धाकट्या सूनबाई’ सध्या चर्चेत आहे. ‘कोठारे व्हिजन्स’ची निर्मिती असलेल्या या मालिकेत नवोदित अभिनेत्री चिन्मयी मोरे आणि अभिनेता मंदार जाधव ही नवी जोडी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

‘धाकट्या सूनबाई’च्या माध्यमातून दोन कुटुंबांची कथा, त्यांचे वेगवेगळे विचार आणि नात्यांमधील गुंतागुंत उलगडणार आहे. आपल्या माणसांची साथ, नात्यांमधला विश्वास आणि प्रेम यामुळे आयुष्याला मिळणारा अर्थ राधिका आणि वेदांतच्या प्रवासातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

कृष्ण मंदिराच्या पायऱ्यांवर लहानपणी सापडलेली राधिका ही आप्पा आणि निर्मलाची दत्तक मुलगी आहे. आप्पांनी तिला कृष्णाचा प्रसाद मानून स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं आहे. सालस, मनमिळाऊ आणि उत्साही स्वभावाची राधिका नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असते. मात्र, घरातील गोदाक्का तिला आजही ‘परकी’ मानतात. त्यामुळे प्रेमळ कुटुंब मिळालं असलं तरी आपल्या जन्मदात्या घराचा आणि खऱ्या माणसांचा शोध तिच्या मनात कायम आहे. दुःखाच्या प्रसंगी ती कृष्णाशी मनमोकळेपणाने संवाद साधते आणि त्यालाच आपला सखा मानते.

दुसरीकडे पटवर्धन कुटुंबातील वेदांत हा ‘आराधना’ या पूजा साहित्य, अत्तर आणि अगरबत्तीच्या व्यवसायाचा वारसदार आहे. हुशार, सुसंस्कृत आणि जबाबदार असलेल्या वेदांतवर आई दमयंतीच्या शिस्तीचे आणि संस्कारांचे प्रतिबिंब आहे. कुटुंबाच्या परंपरांना महत्त्व देणारा वेदांत प्रत्येक आईला वाटावा असा मुलगा आणि प्रत्येक मुलीला वाटावा असा मित्र आहे.

मात्र, राधिकेची भेट झाल्यानंतर वेदांतच्या विचारांना एक वेगळी दिशा मिळते. माणसाची ओळख त्याच्या रक्ताने आणि कुळाने ठरते की त्याच्या मनाने, हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहतो. राधिकेमुळे वेदांतचा स्वतःच्या विचारांकडे पाहण्याचा प्रवास सुरू होतो.

मालिकेत चिन्मयी मोरे राधिकाची भूमिका साकारत असून मंदार जाधव वेदांतच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर या गोदाक्काच्या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या मालिकेच्या निमित्ताने निर्माते महेश कोठारे, मुख्य भूमिका साकारणारे मंदार जाधव आणि चिन्मयी मोरे, तसेच गोदाक्काची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी ‘मुंबई समाचार’सोबत खास संवाद साधला. या खास गप्पांमध्ये कलाकारांनी मालिकेचं कथानक, आपल्या व्यक्तिरेखा, त्यांची वैशिष्ट्यं आणि ‘धाकट्या सूनबाई’च्या निमित्ताने प्रेक्षकांना काय वेगळं पाहायला मिळणार आहे, याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला आहे.

मालिकेच्या पडद्यामागची गोष्ट, कलाकारांच्या भूमिका आणि त्यांच्या अनुभवांविषयी जाणून घेण्यासाठी ‘मुंबई समाचार’सोबतची ही खास मुलाखत नक्की पाहा.

Related Articles

Back to top button