मनोरंजन

चित्रनगरीच्या राजा’चा जल्लोषात स्वागत होणार; यंदाचे ३३ वे वर्ष

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने यंदाही ‘चित्रनगरीच्या राजा’चा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी गणरायाची प्राणप्रतिष्ठा होणार असून, शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी विसर्जनाने या उत्सवाची सांगता होईल. यंदा चित्रनगरीच्या राजाचा हा ३३ वा गणेशोत्सव आहे.

राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा उत्सव विशेष उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान स्टुडिओ क्रमांक १, दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव, मुंबई येथे महाराष्ट्रातील विविध विभागांतील उल्लेखनीय गावांचे दर्शन तसेच चित्रपटांचे गाव असलेल्या चित्रनगरीतील उपक्रमांचे चित्रण देखाव्यातून करण्यात आले आहे. संपूर्ण देखाव्यातून गणरायाच्या विविध रूपांचे पारंपारिक दर्शन घडते. संपूर्ण देखावा पर्यावरण पूरक असून पूजामूर्ती शेतातल्या माती पासून बनलेली बीजमूर्ती आहे. तसेच उत्सवमूर्ती महापालिकेच्या नियमानुसार पुनर्वापरासाठी देण्याच्या दृष्टीने मागील वर्षी प्रमाणे विसर्जनाचे नियोजन करण्यात आले आहे.

सर्व पारंपारिक उत्सवी कला व परंपरांचे दर्शन व्हावे म्हणून जागतिक रील स्पर्धा आणि मराठी गणपती स्तोत्राचे अनावरण करण्यात येत आहे. सर्वांना फिल्मसिटी मुंबई इन्स्टा पेजवरून सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

चित्रनगरीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कला, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि मनोरंजन यांचा सुंदर संगम साधण्यात येणार आहे. गणेशभक्तांनी सहकुटुंब या उत्सवात सहभागी होऊन चित्रनगरीच्या राजाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन चित्रनगरी गणेशोत्सव समितीने केले आहे.

“चित्रनगरीचा गणेशोत्सव हा चित्रपटसृष्टीशी जोडलेल्या कलाकार, तंत्रज्ञ, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणणारा आनंदाचा सोहळा आहे. यंदा गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीच्या राजाचा उत्सव अधिक व्यापक आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा होत आहे. कला, संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाच्या कृपेने चित्रनगरीत आनंद, सकारात्मकता आणि सर्जनशीलतेचे वातावरण अधिक समृद्ध व्हावे, हीच मनोमन प्रार्थना असल्याचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी म्हटले आहे

कार्यक्रमांची रूपरेषा

१४ सप्टेंबर : प्राणप्रतिष्ठा
१५ सप्टेंबर : सेलिब्रिटी आरती
१६ सप्टेंबर : पाककला स्पर्धा
१७ सप्टेंबर : रील मार्गदर्शन शिबीर, अभंग रिपोस्ट , लेन्स लीगसी प्रदर्शन
१८ सप्टेंबर : एन.डी. स्टुडिओ गणपती दर्शन भेट (कोकणातील गणपती उत्सव)
१९ सप्टेंबर : सेलिब्रिटी आरती
२० सप्टेंबर : सेलिब्रिटी आरती
२१ सप्टेंबर : वैद्यकीय चाचणी शिबिर
२२ सप्टेंबर : सत्यनारायण पूजा व दिव्यांग ऑर्केस्ट्रा
२३ सप्टेंबर : हळदीकुंकू कार्यक्रम व चित्रांगण कट्टा
२४ सप्टेंबर : कलाकार, तंत्रज्ञ, कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी वैयक्तिक वित्त व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्य सक्षमीकरण शिबिर तसेच सेलिब्रिटी आरती
२५ सप्टेंबर : गणेशमूर्ती विसर्जन

Related Articles

Back to top button