एक रहस्यमय नाणं, सात मित्र आणि शतकांचा शाप; ‘भूतम् भयम्’चा थरार २५ सप्टेंबरपासून!

प्रांजली कुलकर्णी
नेहमीच्या हॉरर चित्रपटांपेक्षा वेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज असलेला ‘भूतम् भयम्’ हा चित्रपट येत्या २५ सप्टेंबर २०२६पासून झी5 मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भय, विनोद, रहस्य आणि साहस यांचा अनोखा मिलाफ असलेल्या या चित्रपटातून दिग्दर्शक रामचंद्र गावकर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत.
कोणतीही वस्तू सोन्यात बदलण्याची शक्ती असलेल्या एका प्राचीन आणि रहस्यमय नाण्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. झी स्टुडिओज मराठी प्रस्तुत आणि कायरा कुमार क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्मित ‘भूतम् भयम्’मध्ये छाया कदम, पुष्कराज चिरपुटकर, करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे आणि शुभम जाधव यांच्यासह अनेक गुणी कलाकारांच्या भूमिका आहेत.
नेमकी कथा काय?
सात बेरोजगार मित्रांना अचानक एक प्राचीन रहस्यमय नाणे सापडते. हे नाणे कोणतीही वस्तू सोन्यात बदलू शकते, अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी ते या नाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचा प्रवास एका ओसाड आणि भयावह हवेलीपर्यंत पोहोचतो.
‘राणीवाडा’ या हवेलीच्या भिंतीआड शतकानुशतकांचे गूढ दडलेले असते. नाण्याशी जोडलेला एक जुना शाप आणि हवेलीत घडणाऱ्या अलौकिक घटना या मित्रांना संकटात ओढतात. त्यातच त्यांचा मित्र गजा अचानक रहस्यमयरीत्या बेपत्ता होतो आणि परिस्थिती अधिकच भयावह बनते.
यानंतर या सात मित्रांना अलौकिक शक्तींचा सामना करताना मैत्री, लोभ, जगण्यासाठीची धडपड आणि सहज मिळणाऱ्या संपत्तीचे आकर्षण यांच्यातील संघर्षाला सामोरे जावे लागते. भयावह प्रसंगांसोबतच गोंधळातून निर्माण होणारा विनोद, रहस्य आणि अनपेक्षित वळणं यामुळे ‘भूतम् भयम्’ची कथा नेहमीच्या हॉरर-कॉमेडीपेक्षा वेगळी ठरते.
दिग्दर्शक रामचंद्र गावकर म्हणाले…
“‘भूतम् भयम्’चा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. विशेषतः दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच पूर्ण लांबीचा चित्रपट असल्यामुळे त्याचे महत्त्व माझ्यासाठी वेगळे आहे. भय, विनोद आणि साहस यांची सांगड घालत प्रेक्षकांचे मनापासून मनोरंजन करणारी कथा मला तयार करायची होती.
सात मित्रांना अचानक त्यांच्या आयुष्याचा कायापालट करू शकणारी एक वस्तू सापडते आणि नंतर त्याच वस्तूसोबत धोकादायक शाप जोडलेला असल्याचे समजते. या कल्पनेमुळे विनोदासोबतच उत्कंठा निर्माण करण्यासाठी आम्हाला भरपूर वाव मिळाला. झी5 मराठीवर ही वेगळी कथा प्रेक्षकांना अनुभवता येणार असल्यामुळे मी खूप उत्सुक आहे.”
छाया कदम म्हणाल्या…
“‘भूतम् भयम्’मध्ये काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. या चित्रपटात भय आणि विनोद यांचा अनोखा मिलाफ पाहायला मिळणार आहे. टीमने उभे केलेले या कथेचे विश्व गूढ वाटते आणि त्याच वेळी मनोरंजकही आहे.
काही प्रसंग प्रेक्षकांना मनापासून हसवतील, तर काही प्रसंगांमध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता कायम राहील. धमाल गोंधळ, रहस्य आणि अलौकिक घटनांनी भरलेला हा खास अनुभवाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.”
‘भूतम् भयम्’ २५ सप्टेंबर २०२६पासून झी5 मराठीवर पाहायला मिळेल!



