Bajrangi Marathi Movie : भव्य हनुमंताच्या विराट रूपाने वाढवली उत्सुकता; ‘बजरंगी’चे दमदार पोस्टर प्रदर्शित

पंकज राणे
मुंबई – : आगामी मराठी चित्रपट ‘बजरंगी’चे दमदार पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून, या पोस्टरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढवली आहे. भव्य विराट रूपातील हनुमंताची मूर्ती, तिच्यासमोर उभा असलेला तरुण, आजूबाजूला फडकणारे भगवे ध्वज आणि किल्ल्याची पार्श्वभूमी अशा लक्षवेधी दृश्यरचनेतून चित्रपटाची वेगळी झलक पाहायला मिळते. मात्र, पोस्टरमधून कथेचा फारसा उलगडा न करता निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.
पोस्टरमध्ये विराट रूपातील हनुमंताची भव्य मूर्ती विशेष लक्ष वेधून घेते. या मूर्तीसमोर पाठ करून एक तरुण उभा असून, त्याच्या हातात भगवा कपडा दिसत आहे. एका बाजूला हनुमंताचे भव्य रूप, दुसऱ्या बाजूला किल्ला आणि सर्वत्र फडकणारे भगवे ध्वज, तसेच आकाशात पसरलेला सोनेरी प्रकाश यामुळे पोस्टरला भव्य आणि सिनेमॅटिक लूक मिळाला आहे.
पोस्टरमधील या तरुणाचा हनुमंताशी नेमका काय संबंध आहे? त्याच्या आयुष्यात कोणता महत्त्वाचा प्रसंग घडणार आहे? तसेच किल्ला, भगवे ध्वज आणि हनुमंताच्या विराट रूपामागे नेमकी कोणती कथा दडलेली आहे? असे अनेक प्रश्न पोस्टर पाहिल्यानंतर निर्माण होतात. निर्मात्यांनी कथेचा महत्त्वाचा भाग गुलदस्त्यात ठेवत ही उत्सुकता कायम ठेवली आहे.
या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘बजरंगी’ ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. सिद्धार्थ जाधव या भूमिकेतून एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार असून, त्याच्या व्यक्तिरेखेचा कथानकावर नेमका काय प्रभाव पडतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.‘बजरंगी’चे दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केले असून, चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांचे आहे. अवंतिका सिने एंटरप्राइजेस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पोस्टरमधून चित्रपटाच्या कथानकाची काही झलक मिळत असली, तरी व्यक्तिरेखांचा प्रवास आणि कथेमागचे गूढ चित्रपटातूनच उलगडणार आहे.
चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणाले, “‘बजरंगी’ची कथा एका अशा प्रसंगापासून सुरू होते, जो स्वतःमध्येच अनेक प्रश्न निर्माण करतो. श्रद्धा आणि अविश्वास यांच्यात अडकलेल्या एका माणसाचा हा प्रवास आहे. या प्रवासात त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अनपेक्षित गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. पोस्टरमधून कथेचा फारसा उलगडा न करता उत्सुकता निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. चित्रपट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.” भव्य पोस्टरनंतर आता ‘बजरंगी’चा ट्रेलर आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांसमोर कधी येणार, याकडे लक्ष लागले आहे.



