मनोरंजन

Ankita Walawalkar on Trolling : अंकिता वालावलकरच्या मंगळसूत्रावरून ट्रोलिंग; ‘कोकण हार्टेड गर्ल’ने दिलं सडेतोड उत्तर

मुंबई : ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता प्रभू वालावलकर ( Ankita Prabhu Walawalkar ) सोशल मीडियावर (Social media Influencer) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर अंकिताने ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या घरातही सहभाग घेतला. या शोमुळे तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अंकिताला अनेकदा ट्रोलिंगचाही (Trolling) सामना करावा लागतो.अलीकडेच काही नेटकऱ्यांनी अंकिताच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नसल्यावरून तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत प्रश्न उपस्थित केले. या कमेंट्सनंतर अंकिताने आता स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे. विशेष म्हणजे, तिने नेहमीच्या मालवणी अंदाजात या प्रश्नांना उत्तर दिलं आहे.

मंगळसूत्रावरून नेमकं काय म्हणाले ट्रोलर्स?

अंकिताच्या काही सोशल मीडिया पोस्टवर तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसत नसल्याने काही युजर्सनी तिच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले. ‘हिचं लग्न झालं आहे की नाही?’ अशा आशयाच्या कमेंट्स तिच्या पोस्टवर करण्यात आल्या.यानंतर अंकिताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तिने मंगळसूत्र न घातल्यावरून प्रश्न विचारणाऱ्यांना आपल्या खास मालवणी शैलीत उत्तर दिलं.

‘माझं लग्न 16 फेब्रुवारी 2025 ला झालं’

अंकिताने सांगितलं की, तिचं लग्न 16 फेब्रुवारी 2025 रोजी झालं आहे. लग्न झाल्यापासून मंगळसूत्र न घातलेला एकही दिवस नसल्याचं तिने स्पष्ट केलं. मात्र, शूटिंग किंवा कामाच्या वेळी कपड्यांनुसार काही वेगळं परिधान केलं जात असल्याचंही तिने सांगितलं.गळ्यात मंगळसूत्र दिसत नाही म्हणून लग्न झालं की नाही, असा प्रश्न विचारणाऱ्यांवर अंकिताने मिश्कीलपणे निशाणा साधला. आपल्याला बंद गळ्याचे स्वेटशर्ट घालायला आवडतात, त्यामुळे अशा कपड्यांमध्ये मंगळसूत्र दिसत नसेल तर त्यासाठी गळा खाली करून ते दाखवायचं का, असा सवाल तिने केला.

‘उद्यापासून मोठं मंगळसूत्र घालून फिरते’

ट्रोलर्सना उत्तर देताना अंकिताने आता मोठं मंगळसूत्र घालून फिरण्याचा निर्णय घेतल्याचंही मिश्कीलपणे म्हटलं. यामुळे तरी लोकांना तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसेल, असा टोला तिने लगावला. त्याचबरोबर ‘टिकलीही लावली पाहिजे ना’, असं म्हणत तिने या संपूर्ण मुद्द्यावर विनोदी शैलीत भाष्य केलं.अंकिताने पुढे म्हटलं की, महिला काहीही केलं तरी त्यावर कमेंट्स केल्या जातात. काही घातलं तरी बोललं जातं आणि काही घातलं नाही तरी बोललं जातं. मंगळसूत्र घातलं आणि त्यासोबत छोटे कपडे परिधान केले, तर त्याचं कौतुक होईल का, असा प्रश्नही तिने उपस्थित केला.

‘नवऱ्याला मानगुटीवर बसवू का?’

या व्हिडीओमध्ये अंकिताचा पती कुणाल भगत देखील दिसतो. अंकिता त्याला मजेशीर अंदाजात बोलावते आणि ‘ये, आता माझ्या मानगुटीवर बस. म्हणजे लोकांना कळेल की माझं लग्न झालं आहे’, असं म्हणते. त्यानंतर दोघांमध्ये झालेला हा मजेशीर संवादही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो.अंकिताचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंगळसूत्रावरून ट्रोल करणाऱ्यांना तिने दिलेल्या उत्तराचं अनेक नेटकरी कौतुक करत असून, कमेंट्समधून तिच्या बेधडक आणि विनोदी अंदाजाला पसंती मिळताना दिसत आहे.

Related Articles

Back to top button