मनोरंजन

Amitabh Bachchan Slips and Falls At KBC 18 Shoot : शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा पाय घसरला; गुडघ्याला दुखापत, नेमकं काय घडलं?

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. ‘कौन बनेगा करोडपती 18’च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांचा पाय घसरून ते खाली पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे सध्या त्यांना उभं राहण्यास त्रास होत असल्याची माहिती खुद्द अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमादरम्यान दिली.

‘कौन बनेगा करोडपती १८’च्या प्रत्येक भागाची सुरुवात अमिताभ बच्चन यांच्या खास अंदाजात होते. शोच्या सुरुवातीला ते मंचावर येत प्रेक्षकांशी संवाद साधतात. मात्र, यावेळी त्यांच्या दुखापतीमुळे या नेहमीच्या पद्धतीत बदल करावा लागला.

शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं?

शूटिंगच्या आदल्या दिवशी मंचावर येताना अमिताभ बच्चन यांचा पाय घसरला आणि ते खाली पडले. या घटनेत त्यांच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे मंचावर उभं राहणं त्यांच्यासाठी कठीण झालं आहे. याबाबत त्यांनी स्वतःच स्टुडिओमधील प्रेक्षकांना माहिती दिली.अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, साधारणपणे ते मंचाच्या मध्यभागी उभं राहून कार्यक्रमाची सुरुवात करतात. मात्र, गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे यावेळी त्यांना बसून सुरुवातीचा संवाद साधावा लागणार आहे.

चाहत्यांनी व्यक्त केली चिंता

अमिताभ बच्चन यांनी दुखापतीची माहिती दिल्यानंतर स्टुडिओमधील प्रेक्षकांनी त्यांची विचारपूस केली. चाहत्यांचं प्रेम आणि काळजी पाहून आपल्याला नवी ऊर्जा मिळते, असं त्यांनी सांगितलं. दुखापत गंभीर नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.उभं राहणं कठीण असलं तरी कार्यक्रम सुरू ठेवण्याचा आपला प्रयत्न असेल, असं अमिताभ बच्चन यांनी यावेळी सांगितलं. मात्र, कार्यक्रमाच्या सुरुवातीचा भाग बसून सादर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

दरम्यान, दुखापतीनंतरही अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमाचं शूटिंग सुरू ठेवलं. यावेळी त्यांनी स्पर्धक शौर्य दास यांचं स्वागत केलं. शौर्य दास यांनी २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत मजल मारली. मात्र,50 लाख रुपयांच्या प्रश्नावर त्यांना अडचणींचा सामना करावा लागला.अमिताभ बच्चन यांच्या दुखापतीची ही माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button