Ali Mothi Shahani News Song Phulpakhru : ‘आली मोठी शहाणी’मधील ‘फुलपाखरू’ गाणं प्रदर्शित

स्वच्छंदी जगणं, मनमुराद आनंद आणि आपल्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याची इच्छा… याच भावनांना सुरेल रूप देणारं ‘फुलपाखरू’ हे गाणं ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात चित्रित झालेल्या या गाण्यात हृता दुर्गुळे फुलपाखरासारखी बंधनमुक्त आणि उत्साही अंदाजात दिसत आहे.गोव्याच्या सुंदर गल्ल्या, हिरवागार निसर्ग, अथांग समुद्र आणि मोकळं आकाश यांची सुंदर सांगड या गाण्यात घालण्यात आली आहे. कधी बाइकवरून गोव्याच्या रस्त्यांवर बिनधास्त फिरताना, तर कधी समुद्राच्या सान्निध्यात निवांत क्षण अनुभवताना हृता दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि जगण्याकडे पाहण्याचा मोकळा दृष्टिकोन गाण्याला वेगळी ऊर्जा देतो.
‘फुलपाखरू’ या गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांनी लिहिले असून संगीत पंकज पडघण यांचे आहे. अपूर्वा निषाद यांनी हे गाणं गायलं असून उमेश जाधव यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गाण्यातील गोव्याच्या लोकेशन्स आणि हृताचा स्वच्छंदी अंदाज यामुळे प्रत्येक फ्रेम लक्षवेधी ठरत आहे. संगीतकार पंकज पडघण यांच्या मते, गाण्यातून आयुष्याकडे मनमुरादपणे पाहण्याची भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर लेखक-दिग्दर्शक आनंद दिलीप गोखले यांनी ‘फुलपाखरू’मधून चित्रपटातील व्यक्तिरेखेचा एक सुंदर पैलू समोर येत असल्याचं सांगितलं आहे.‘आली मोठी शहाणी’ हा चित्रपट आनंद दिलीप गोखले लिखित-दिग्दर्शित असून फाईन ब्रू प्रोडक्शन्स आणि ट्रू होप फिल्म्स वर्क यांच्या वतीने निर्मिती करण्यात आली आहे. जयकुमार मुनोत, ईशा मुठे आणि श्रुती साठे हे निर्माते आहेत. हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



