Afratafri Marathi Movie Trailer : एक कोटींचा पैसा आणि तीन भाऊ; ‘अफरातफरी’चा ट्रेलर पाहिलात का?

मुंबई / पंकज राणे : एक कोटी रुपयांची रक्कम समोर आली की नात्यांमधली गणितंही बदलू शकतात. त्यातच ही रक्कम तीन भावांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनली, तर गोंधळ आणि गंमत होणारच! अशाच भन्नाट गोंधळाची झलक दाखवणाऱ्या ‘अफरातफरी’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमधील प्रसंग, संवाद आणि पात्रांची धावपळ पाहता चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.ट्रेलरमध्ये एक कोटी रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी तीन भावांची सुरू असलेली धडपड पाहायला मिळते. या पैशांसाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने डावपेच आखताना दिसतो. त्यातून निर्माण होणारे गैरसमज, गमतीदार प्रसंग आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी सुरू असलेल्या युक्त्या कथेला विनोदी वळण देतात.
चित्रपटात शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमध्ये या कलाकारांच्या व्यक्तिरेखांचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतात. एकीकडे एक कोटींच्या रकमेची लालसा, तर दुसरीकडे त्यासाठी सुरू असलेली भावांची चढाओढ, यामुळे कथेतला गोंधळ अधिकच रंगतदार झाल्याचे दिसते.
ट्रेलर अनेक प्रश्न निर्माण करतो. तात्यांच्या मृत्यूमागचं खरं कारण काय? एक कोटींची पॉलिसी खरंच तीन भावांच्या हातात येणार का? पैशांसाठी सुरू झालेली धावपळ शेवटी कुठे जाऊन थांबणार? आणि या सगळ्या खेळात कोण कोणाला गंडवणार? या प्रश्नांची उत्तरं मात्र चित्रपट पाहिल्यानंतरच मिळणार आहेत.दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे यांनी सांगितले की, टिझरमधून ‘अफरातफरी’ची सुरुवात दाखवण्यात आली होती, तर ट्रेलरमधून या गोंधळामागची गंमत आणि पात्रांची धावपळ अधिक उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एक कोटी रुपयांची रक्कम ही कथेतील प्रत्येक पात्राच्या निर्णयाला वेगळी दिशा देते. प्रत्येक पात्राला आपला डाव योग्य वाटत असला, तरी या सगळ्या डावपेचांचा शेवट नेमका कुठे होतो, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल, असे त्यांनी म्हटले.मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित ‘अफरातफरी’ हा चित्रपट अ स्कायलाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



